पुणे–बंगळूर प्रवास आता फक्त सात तासांत! तब्बल 55 हजार कोटींचा नवा आठपदरी महामार्ग

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ ऑक्टोबर २०२५ | पुणे ते बंगळूर हा प्रवास केवळ सात तासांत पूर्ण करण्याची हमी देणाऱ्या नव्या आठ पदरी महामार्गाचे (Pune to Bengaluru New 8-Lane Expressway) काम २०२६ मध्ये सुरू होणार आहे. या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर बेळगाव ते बंगळूर हा प्रवासही केवळ चार ते पाच तासांत पूर्ण करता येणार आहे.

नव्या महामार्गाचे काम केवळ दोन वर्षांतच पूर्ण करण्याचेही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे नियोजन आहे. या महामार्गासाठी (NHAI Project) तब्बल ५५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. विशेष म्हणजे हा महामार्ग महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांतून जाणार असला तरी कोणत्याही प्रमुख शहरातून जाणार नाही. त्यामुळे हा महामार्ग प्रमुख शहरांना जोडण्यासाठी उपमार्गांची निर्मिती केली जाणार आहे.

सध्याचा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ (पूर्वीचा क्रमांक ४) ८५६ किलो मीटर लांबीचा आहे. नवा महामार्ग ७४५ किलो मीटर लांबीचा अणार आहे. सध्याच्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाशी हा नियोजित महामार्ग बंगळूर येथील नेलमंगला येथील सॅटेलाईट टाऊनजवळ मिळणार आहे. त्याआधी हे दोन्ही महामार्ग कोठेही एकमेकांशी मिळणार नाहीत.

केंद्र शासनाच्या भारतमाला योजनेतून हा नवा महामार्ग होणार आहे. या आठपदरी महामार्गावरून ताशी १२० किमी वेगाने प्रवास करणे शक्य होणार आहे. त्यामुळेच पुणे व बंगळूर या दोन शहरांमधील अंतर व प्रवासाचा वेळ कमी होणार आहे. या महामार्गावरील दोन लेन हे ट्रक व बससाठी आरक्षित असतील, तर दोन लेन मोटार, इतर गाड्यांसाठी आरक्षित असतील.

या महामार्गावर दुचाकी व तीनचाकी वाहनांना प्रवेश असणार नाही. त्यामुळे या वाहनांचा अडथळा मोटार किंवा अन्य मोठ्या चारचाकी वाहनांना होणार नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजू बंदिस्त असणार आहेत. त्यामुळे तेथे जनावरांचा वावर असणार नाही. अपघातांची संख्याही कमी होणार आहे. कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यांतून हा महामार्ग जाईल.

या दोन्ही राज्यांकडून त्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. तांत्रिक बाबींची औपचारिकता पूर्ण झाल्‍यावर पुढील वर्षी म्हणजे २०२६ मध्ये प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. या महामार्गावर पूल व उड्डाणपुलांची निर्मितीही मोठ्या संख्येने होणार आहे. संपूर्ण महामार्ग सिमेंट कॉंिक्रटचा असणार आहे. सर्वेक्षणाचे व भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

महाराष्ट्रातून तीन, कर्नाटकातून चार जिल्ह्यांतून जाणार
महाराष्ट्रातील पुणे, सातारा व सांगली या तीन व कर्नाटकातील बेळगाव, बागलकोट, दावणगिरी व चित्रदुर्ग या चार जिल्ह्यांतून हा महामार्ग जाणार आहे. या नव्या महामार्गामुळे पुणे-बंगळूर महामार्ग क्रमांक ४८ वरील ताण कमी होणार आहे. या महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडीची समस्याही दूर होणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *