![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ३ डिसेंबर २०२५ | सराफा बाजारात सोन्याचा भाव पुन्हा एकदा बेत सोडून धावत आहे. साध्या माणसाच्या खिशाला चटका लावणारे हे दर पाहून लोकांच्या डोळ्यांसमोर खरंच काळोख यावा. रोजच्या रोज चढणारे आकडे पाहून आता “सोने म्हणजे गुंतवणूक की त्रास?” असा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. आज ३ डिसेंबरला बाजार उघडताच दरांनी पुन्हा कमाल करत ग्राहकांची झोप उडवली.
बुलियन मार्केटच्या आकडेवारीनुसार १० ग्रॅम २४ कॅरेट सोनं तब्बल १,३०,९३० रुपयांवर पोहोचलं आहे. २२ कॅरेटही १,२०,०१९ रुपयांवर उभं राहत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय. चांदीही मागे नाही; किलोचा दर १,८४,३८० रुपये नोंदवत तिनेही आपल्या ‘चांदी’ची किमया दाखवली आहे. मेकिंग चार्ज, कर, उत्पादन शुल्क यामुळे दागिन्यांच्या अंतिम किमती तर त्याहूनही वर जात आहेत.
मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक—सगळीकडेच एकच चित्र. प्रत्येक शहरात २२ कॅरेटचे दहा ग्रॅम ११९,७९९ वरच तर २४ कॅरेट १३०,६९० वरच स्थिर. ज्वेलर्सकडे चौकशी करणाऱ्यांची रांग आहे; पण हातात घेऊन निघणाऱ्यांची संख्या घटतेय. “खरेदी करण्यापूर्वी विचार करा” हा लिखित नसलेला नियम आता जनतेने स्वतःच स्वीकारलाय.
आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, डॉलरचे चढ-उतार आणि ग्लोबल तणाव यामुळे सोन्याला मागणी वाढली, आणि दरांनी आकाशाला टेकलं. पण प्रश्न एकच—ही वाढ सामान्य जनतेच्या उपजीविकेला किती परवडणारी? आकडे दररोज वर जात आहेत, पण मराठी माणसाचा श्वास मात्र खाली. सोने तेजीत आहे, पण घरगुती तिजोरी मात्र रिकामी होत चाललीय—हेही तितकंच खरं.
