![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ३ डिसेंबर २०२५ | परवाना संपलेला… आणि उड्डाण आठ वेळा! हे ऐकून साधा प्रवासीही थक्क होईल, पण एअर इंडिया मात्र “सगळं चालतं” या अविर्भावात आकाशात विहार करत होती. टाटा समूहाच्या या विमानसेवेने अशी बेफिकिरी दाखवावी, हे स्वतः आकाशालाही पटले नसावे. कारण ज्या परवान्यावर प्रवाशांचा जीव टांगलेला असतो, त्याच परवान्याची मुदत संपूनही विमान उडत होतं—तेही एकदा-दोनदा नव्हे तर सलग आठ वेळा!
वास्तवाचा धक्का
’ए320’—१६४ सीटांचं विमान… आणि त्याचं उड्डाण प्रमाणपत्र एक्सपायर. तरी २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी या विमानाला आकाशात चक्कर मारायला कोणीही थांबवलं नाही. जसा एखादा ट्रॅफिक सिग्नल बंद असेल तर काही वाहने बेधडक जातात, तसंच हे विमानही हवेत. बाब उघडकीस येताच तात्काळ विमानाला बाजूला करण्यात आलं. ते नशीब—नाहीतर बातमी ‘धोक्यातून बचावले’ अशी आली असती.
नियमांचे महत्त्व आणि उघड बेजबाबदारी
विमानांना मिळणारे उड्डाण प्रमाणपत्र म्हणजे ‘जीवन विमा’च. डीजीसीए वर्षातून एकदा त्याची तपासणी करून नूतनीकरण करते. विमान उड्डाणयोग्य आहे का, देखभाल नीट झाली का—या सगळ्या चाचण्या पार केल्यावरच परवाना मिळतो. आणि अशा परवान्याशिवाय उड्डाण करणं म्हणजे नियमांच्या तोंडावर थेट कुलूप मारणं! ज्यांच्या जबाबदारीत हे होतं, त्या सर्वांची तत्काळ निलंबनासह चौकशी सुरू करण्यात आली आहे.
डीजीसीएने आता ए320 च्या उड्डाणांवर स्थगिती आणली. पण प्रश्न असा—दिवसाचे दिवस ही चूक कोणाच्या नजरेसून सुटली? प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न असताना ‘चालेल, उद्या बघू’ हा सरकारी वा खासगी कोणत्याही व्यवस्थेचा स्वभाव असू नये. विमान उड्डाण करायचं—तेही एक्सपायर परवाना घेऊन—ही चूक नाही; ही प्रवाशांच्या विश्वासाची खुली पायमल्ली आहे. आणि सांगायचं झाले तर—“आकाशाला गवसणी घालायची म्हणणाऱ्यांनी आधी कागदावरच्या तारखा तरी बरोबर पहाव्यात!”
