![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ०९ डिसेंबर २०२५ | महाराष्ट्रात पुन्हा उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा जोर वाढला आहे आणि राज्य अक्षरशः थंडीच्या विळख्यात सापडल्याचे चित्र दिसत आहे. धुळेच्या कृषी महाविद्यालयात पारा ५.४ अंशांवर घसरताच हंगामातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली. विदर्भासह अनेक भागांत सकाळचे वातावरण धुक्याने झाकले असून, नागरिक शेकोट्यांभोवती गोळा होत गारठ्यापासून बचाव करताना दिसत आहेत. या अचानक वाढलेल्या थंडीने नागरिकांना अक्षरशः गार करून सोडले आहे.
उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. नाशिकच्या ग्रामीण पट्ट्यात पारा खाली घसरत असून मालेगावने ९ अंशांचा टप्पा गाठत हंगामातील थंडीचे नवीन पान उघडले आहे. यवतमाळनेही ८.८ अंशांसह सर्वात कमी किमान तापमानाची नोंद केली. जळगाव, अमरावती, नागपूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्येही थंडीचा कडाका वाढल्याने सकाळी-संध्याकाळी शीतलहरींचा प्रभाव ठळक जाणवत आहे. दिवसाचे तापमान मात्र उलट वाढत असल्याने तापमानातील ही तफावत नागरिकांना अधिकच त्रासदायक ठरत आहे.
हवामान विभागाच्या निकषानुसार किमान तापमान १० अंशांच्या खाली गेले, किंवा सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी घसरले की ‘थंडीची लाट’ मानली जाते. रविवारचा दिवस धुळे, निफाड, परभणी, अमरावती आणि यवतमाळसाठी अशाच थंडीच्या लाटेचा होता. आज वर्धा, नागपूर आणि गोंदिया येथे शीतलहरींची शक्यता व्यक्त करत हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. थंडीचा हा फटका पुढील ४८ तास तरी कायम राहणार असल्याचे संकेत हवामान तज्ज्ञांकडून मिळत आहेत.
उद्यापासून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तीव्र थंडीच्या लाटेचा इशारा अधिकृतपणे देण्यात आला आहे. या बदलत्या हवामानामुळे वृद्ध, बालकं आणि शेतकरी वर्ग विशेष त्रस्त झाला आहे. सकाळच्या वेळी रस्त्यांवर दाट धुक्याची चादर पसरत असून, ग्रामीण भागात तापमानातील घसरण पिकांनाही फटका देण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, उबदार कपडे परिधान करावेत आणि हवामानाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.
