✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक ०९ डिसेंबर २०२५ | Donald Trump New Tariff on India: अमरिकेने भारतावर आत्तापर्यंत ५० टक्के टॅरिफ लादले आहेत. यातील नियोजित २५ टक्क्यांबरोबरच रशियाशी व्यापार चालू ठेवल्यामुळे लादलेल्या अतिरिक्त २५ टक्के टॅरिफचादेखील समावेश आहे. या पार्श्वभूमीवर भारत व अमेरिकेतील व्यापारविषयक चर्चादेखील चालू असून त्यातून भारतासाठी सकारात्मक मुद्दे समोर येऊ शकतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. मात्र, एकीकडे या चर्चांकडे भारताच्या व्यापार विश्वाचं लक्ष असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर नव्याने टॅरिफ आकारण्याचे सूतोवाच केले आहेत. त्यामुळे आता ट्रम्प नेमकं काय करणार? याविषयी अंदाज बांधले जात आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये बैठक, ट्रम्प यांचे संकेत
सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे कृषीविषयक सचिव ब्रूक रोलिन्स, अमेरिकेतल्या शेतीप्रधान राज्यांचे लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची एक बैठक व्हाईट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आली होती. डोनाल्ड ट्रम्प या बैठकीसाठी उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या उपाययोजनांबद्दल या सर्वांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी अमेरिकेती शेतकऱ्यांसाठी तब्बल १२ बिलियन डॉलर्सचं आर्थिक पॅकेज जाहीर केलं. यावेळी शेतकऱ्यांनी देशांतर्गत बाजारपेठेत मिळणाऱ्या स्वस्त मालामुळे अमेरिकन मालाला आंतरराष्ट्रीय उत्पादनांशी मोठी स्पर्धा करावी लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला.
शेतकऱ्यांनी मांडलेल्या मुद्द्यानुसार, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून अमेरिकेत आयात होणाऱ्या स्वस्त दरातील शेती उत्पादनांमुळे अमेरिकन उत्पादनांना स्पर्धेत टिकून राहाणं कठीण होत आहे. अमेरिकेतील शेतमालाला मिळाणाऱ्या कमी भावासाठी या शेतकऱ्यांनी भारत व थायलंडसारख्या देशांना जबाबदार धरलं आहे. या देशांकडून स्वस्त दरातील शेतमाल अमेरिकेत निर्यात केला जातो आणि त्यामुळे अमेरिकेतील मालाला मोठं आव्हान निर्माण होतं, अशी तक्रार या शेतकऱ्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे केली. तेव्हा, “भारतीय तांदूळ अमेरिकेत येत असल्याच्या प्रकारावर उपाययोजना केली जाईल”, असं आश्वासन ट्रम्प यांनी शेतकऱ्यांना दिल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं ब्लूमबर्गच्या हवाल्याने दिलं आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिरिक्त टॅरिफ आकारण्याचे सूतोवाच दिले. “भारताकडून अशा प्रकारे त्यांचा माल अमेरिकेत पाठवला जाऊ नये. मी याबाबत ऐकलं आहे अनेकांकडून. ते असं करू शकत नाहीत”, असं म्हणत ट्रम्प यांनी वित्त विभागाचे सचिव स्कॉट बेसंट यांच्याकडे पाहून “भारताला हे का करू दिलं जात आहे? त्यांनी यासाठी टॅरिफ भरायला हवं. त्यांना तांदुळावर सूट दिली आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर बेसंट यांनी “आम्ही अजून भारताशी व्यापारविषयक करारावर काम करत आहोत”, अशी माहिती दिली.
कॅनडाही ट्रम्प यांच्या रडारवर!
दरम्यान, भारताप्रमाणेच कॅनडामधून आयात होणाऱ्या खतांवरदेखील टॅरिफ आकारण्याबाबत ट्रम्प यांनी सूतोवाच केले. तसेच, या खतांचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्याचेही निर्देश ट्रम्प यांनी प्रशासनाला दिले. “आपल्या वापरापैकी खतांचा मोठा हिस्सा कॅनडातून येतो. आपल्याला जर गरज पडली, तर कॅनडावर मोठ्या प्रमाणावर टॅरिफ आकारावं लागेल. कारण त्यातूनच अमेरिकेतील देशांतर्गत उत्पादन वाढेल. आपण ती सगळी उत्पादनं अमेरिकेत घेऊ शकतो”, असं ट्रम्प यावेळी म्हणाले.
