चांदीचा नवा उच्चांक! दहा दिवसांत १३ हजारांची उडी; सोन्याचे दरही गगनाला

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १२ डिसेंबर २०२५ | गेल्या दहा दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. यामध्ये चांदीने तब्बल १३ हजार रुपयांची झेप घेत नवा उच्चांक गाठला आहे. प्रतिकिलो चांदीचा दर २ लाख ९ हजार रुपये (जीएसटीसह) इतका झाला आहे. बुधवारी तो २ लाख ७ हजार होता. जागतिक पातळीवरील अस्थिरता, गुंतवणुकीत अचानक वाढ आणि धातूंच्या बाजारातील कमी पुरवठा यामुळे भारतीय बाजारातही चांदीचे भाव सातत्याने वाढत आहेत.

चांदीची मागणी दागिने निर्मितीबरोबरच मोबाइल फोन, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक्स आणि सौर पॅनेलमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असल्याने मागणी सतत वाढत आहे. त्याच्या तुलनेत पुरवठा मर्यादित असल्याने चांदी सहज उपलब्ध होत नाही. चीनच्या चांदीविषयक बदललेल्या धोरणांनीही जागतिक बाजारात खळबळ माजवली असून त्याचा थेट परिणाम किंमतींवर झाला आहे. यासोबतच फिजिकल चांदीत वाढलेले गुंतवणूक प्रवाहही दरवाढीस कारणीभूत ठरत आहेत.

दरम्यान सोन्याच्या भावातही वाढ कायम आहे. पुण्यात २४ कॅरेट सोनं जवळपास १ लाख ३० हजार रुपये (१० ग्रॅम) आणि २२ कॅरेट सोनं सुमारे १ लाख १९ हजार रुपयांवर पोहोचल्याने सामान्य ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोनं-चांदीचे दर गगनाला भिडल्याने किरकोळ ग्राहक खरेदी टाळताना दिसत आहेत. हुपरी, पुणे आणि मुंबईसह राज्यातील सराफ बाजारात ग्राहकांची पावलं कमी पडू लागली आहेत.

१ जानेवारी २०२५ ला ९०,६४० रुपये प्रतिकिलो असलेली चांदी आज दुपटीहून अधिक किमतीवर पोहोचली आहे. ५ डिसेंबर ते ११ डिसेंबरदरम्यान चांदीचा दर १,९६,००० वरून थेट २,०९,००० पर्यंत वाढला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अनिश्चितता, औद्योगिक क्षेत्रातील मागणीत सातत्याने होत असलेली वाढ आणि मर्यादित पुरवठा पाहता पुढील काही आठवड्यांतही चांदीचा दर वाढतच राहील, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *