![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १२ डिसेंबर २०२५ | उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरींमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. किमान तापमानात अचानक मोठी घट झाली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या विभागांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुंबई आणि पुण्यासह धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, सोलापूर आदी भागातही थंडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यांमध्ये तर विदर्भातील नागपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळमध्ये थंडीची लाट तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामानानुसार, सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी तापमान घटले की ‘थंडीची लाट’, तर ६.५ अंशांपेक्षा जास्त घट झाली तर ‘तीव्र थंडीची लाट’ मानली जाते. पुढील ४८ तासांमध्ये तापमानात आणखी १ ते २ अंशांची घट होऊन नंतर काहीशी वाढ होईल, असा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, परभणी जिल्ह्यात थंडीने विक्रमी थैमान घातले आहे. सलग आठ दिवस पारा १० अंशांच्या खाली असून आज तापमान केवळ ५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ग्रामीण भागात हाडे गोठवणारी थंडी जाणवत असून शेकोट्यांचा आधार घेण्याची वेळ आली आहे. प्रखर थंडीत उस, हरभरा, ज्वारीसारख्या पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्यावेळी शेतात जावे लागत असल्याने त्यांचे हाल अधिकच वाढले आहेत.
राज्यातील इतर जिल्ह्यांतही पारा मोठ्या प्रमाणात खाली घसरला आहे. पुण्यात ७.९, नाशिक ८.२, मालेगाव ८.८, जळगाव ७.०, गोंदिया ८.०, नागपूर ८.१, तर सातारा आणि अकोला १० अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूरसह अनेक भागातही गारठा कायम असून सकाळ-संध्याकाळच्या थंडीत मोठी वाढ जाणवत आहे. थंडीचा हा कडाका पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
