✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १५ डिसेंबर २०२५ | पुण्याच्या जगप्रसिद्ध हिंजवडी आयटी पार्कवरील वाढता ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने निर्णायक पाऊल उचलले आहे. राज्यातील पाचवे मोठे IT पार्क कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे-केंद्रित आयटी विकासाला आता पर्यायी दिशा मिळणार असून, कोल्हापूरसारखा पारंपरिक औद्योगिक जिल्हा थेट आयटी नकाशावर झळकणार आहे. हिंजवडीनंतर पुरंदर, सोलापूर, सातारा आणि आता कोल्हापूर असे चार ठोस पर्याय उभे राहत असल्याने आयटी क्षेत्राचा समतोल विकास साधला जाणार आहे.
कोल्हापूर आयटी पार्कसाठी एकूण ४२ हेक्टर जागा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये शेंडा पार्क परिसरातील ३४ हेक्टर जमीन आणि नवीन क्रीडा संकुल व शासकीय दंत महाविद्यालयासाठी ८ हेक्टर जागेचा समावेश आहे. आरोग्य व कृषी विभागाच्या अखत्यारितील ही जमीन आयटीसह विविध शासकीय प्रयोजनांसाठी वापरण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येणार असून, त्यानंतर अधिकृत निर्णय अपेक्षित आहे.
कोल्हापूरमध्ये आयटी पार्क व्हावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आमदार राजेश क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित केला होता, तर आमदार अमल महाडिक यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जागेची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रस्ताव तयार करून विभागीय आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर केला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, कोल्हापूर आयटी पार्कनिर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, राज्य सरकार पुणे विमानतळाजवळील पुरंदर, तसेच सोलापूर आणि सातारा येथेही मोठ्या आयटी पार्क्सच्या उभारणीवर काम करत आहे. या निर्णयांमुळे पुण्यावरील आयटीचा भार कमी होणार असून, पश्चिम महाराष्ट्रात रोजगार, पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. कोल्हापूरसाठी हा निर्णय केवळ आयटी पार्कचा नसून, जिल्ह्याच्या आर्थिक भवितव्याला कलाटणी देणारा ठरणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
