![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १५ डिसेंबर २०२५ | नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ग्राहकांनी ज्या आनंदाने खरेदीची यादी तयार केली होती, त्यावर आता महागाईने पाणी फेरण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कारसारख्या वस्तूंच्या किंमती जानेवारी २०२६ पासून ४ ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. अलीकडेच सरकारने मोठ्या टीव्ही स्क्रीनवरील जीएसटी कमी करून दिलेला दिलासा आता क्षणात हवेत विरणार, अशी परिस्थिती आहे. “कर कमी, पण दर जास्त” असा अनुभव ग्राहकांच्या वाट्याला येणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.
या संभाव्य दरवाढीमागे दोन मोठी कारणं आहेत. पहिले म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे निर्माण झालेली जागतिक चिप्स टंचाई. एआयसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘हाय-बँडविड्थ मेमरी’ चिप्सची मागणी इतकी वाढली आहे की, सामान्य टीव्ही, मोबाईल आणि लॅपटॉपसाठी लागणाऱ्या चिप्सचा पुरवठा कमी झाला आहे. अहवालानुसार, काही मेमरी चिप्सच्या किंमती तब्बल ५०० टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. उत्पादन खर्च वाढल्यावर कंपन्या तो बोजा ग्राहकांवर टाकणार, हे अटळच ठरतं.
दुसरं मोठं कारण म्हणजे भारतीय रुपयाचं ऐतिहासिक अवमूल्यन. रुपयाने डॉलरसमोर ९० चा टप्पा ओलांडल्याने आयातीचा खर्च प्रचंड वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी लागणारे सेमीकंडक्टर, डिस्प्ले पॅनल्स आणि मदरबोर्ड यापैकी सुमारे ७० टक्के घटक आयात करावे लागतात. रुपया कमजोर, डॉलर मजबूत आणि आयात महाग — या त्रिसूत्रीमुळे उत्पादन खर्च फुगतोय. परिणामी, जीएसटी कपातीचा फायदा कागदावरच राहून, बाजारात मात्र ग्राहकांच्या खिशावरच कात्री चालणार, असं चित्र आहे. थोडक्यात काय, नववर्षात “स्मार्ट” खरेदी करायची असेल, तर आधीच बजेटचा स्मार्टफोन ‘अपडेट’ करून ठेवावा लागणार आहे!
