✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १५ डिसेंबर २०२५ | क्रिकेटच्या जयघोषाने कायम गजबजलेले मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम रविवारी एका वेगळ्याच उत्साहाने दणाणून गेले. कारण होते — फुटबॉल विश्वाचा जादूगार लिओनेल मेस्सी! अर्जेंटिनाचा सुपरस्टार मेस्सी भारत दौऱ्यावर मुंबईत दाखल होताच, वानखेडेवर सुमारे ३० हजारांहून अधिक फुटबॉलप्रेमींनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं. मेस्सीसोबत लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल या आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टार्सची उपस्थिती असल्याने वातावरण आणखीनच भारावून गेलं. सायंकाळी ५.५१ वाजता मेस्सी वानखेडेवर पोहोचताच ‘Messi… Messi’च्या घोषणांनी स्टेडियम अक्षरशः थरारून गेलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी ‘प्रोजेक्ट महादेव’ या उपक्रमाचं अनावरणही करण्यात आलं.
या कार्यक्रमातील सर्वात भावनिक आणि ऐतिहासिक क्षण ठरला तो म्हणजे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आणि फुटबॉलचा राजा लिओनेल मेस्सी यांची भेट. दोघांचाही जर्सी क्रमांक — १०. त्यामुळे वानखेडेवर अक्षरशः ‘१०’ची जादू अनुभवायला मिळाली. सचिन आणि मेस्सी एकमेकांना भेटताच चाहत्यांनी ‘सचिन… सचिन’चा जयघोष केला. सचिनने मेस्सीला २०११ विश्वचषक विजेत्या भारतीय संघाची जर्सी भेट दिली, तर मेस्सीने सचिनला फुटबॉल सप्रेम दिला. “लिओ केवळ दिग्गज नाही, तर त्याचं साधेपणाच त्याला महान बनवतं,” अशा शब्दांत सचिनने मेस्सीचं कौतुक केलं.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या ‘प्रोजेक्ट महादेव’ अंतर्गत १३ वर्षांखालील ३० मुले आणि ३० मुलींना मेस्सी, सुआरेझ आणि रॉड्रिगो यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या दिग्गजांसोबत काही मिनिटं मैदानावर खेळण्याची संधी मिळाल्याने लहान खेळाडूंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. एका चिमुकल्या मुलीने सुआरेझला चकवत चेंडू त्याच्या पायातून पुढे नेताच, खुद्द सुआरेझही क्षणभर थक्क झाला.
या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, विफा अध्यक्ष प्रफुल पटेल, सुनील छेत्री तसेच अजय देवगण, टायगर श्रॉफ, डिनो मोरियो यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती. वानखेडेवर साकारलेला हा क्षण भारतीय क्रीडइतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा ठरला.
