पुण्यात ऑक्सिजन टँकर्सवर लागणार सायरन ; रुग्णवाहिकेचा दर्जा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – पुणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात आता प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या टँकर्सना रुग्णवाहिकेचा दर्जा मिळणार आहे. वैद्यकीय यंत्रणांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या या टँकर्सवर आता रुग्णवाहिकेप्रमाणे भोंगा (सायरन) लावण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

गेल्या काही दिवसांत मुंबई, पुणे, अंबरनाथ आणि बदलापुरात लिक्विड ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा भासत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा थोड्यावेळासाठीही थांबल्यास रुग्णांचा जीव जाण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने रुग्णालयांना करण्यात येणारा ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी औद्योगिक क्षेत्राला पुरवणाऱ्या जाणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यात मोठी कपात करण्यात आली होती. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०० हून अधिक बेडस् असणाऱ्या प्रत्येक रुग्णालयात लिक्विड ऑक्सिजनचा प्लॅन्ट उभारण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाला राज्य सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याची ऑक्सिजनची गरज ४०० मेट्रिक टन एवढी असून उत्पादन क्षमता १०८१ मेट्रिक टन आहे. सध्या राज्यात ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर १७ हजार ७५३, बी टाईप सिलिंडर- १५४७, डयुरा सिलिंडर- २३०, लिक्विड क्रायोजनिक ऑक्सिजन टँक्स १४ असून आणखी १६ ठिकाणी काम सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *