‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात ; खासदार संजय राऊत ; या निमित्तानं राज ठाकरे यांनाही साद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – मुंबई – ‘ठाकरे’ आणि ‘पवार’ हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ब्रॅण्ड आहेत. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे,’ असा घणाघाती आरोप शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी या निमित्तानं राज ठाकरे यांनाही साद घातली आहे.

‘सामना’तील रोखठोक सदरात मुंबई विषयी लिहिलेल्या लेखात राऊत यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर सडेतोड भाष्य केलं आहे. ‘महाराष्ट्राची राजधानी मुंबईस ग्रहण लावण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले आहेत. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. हे ग्रहण ‘उपरे’ लावत आहेत. पण त्यांना बळ देण्यासाठी परंपरेप्रमाणे आपल्यातलेच घरभेदी सरसावले आहेत. मधल्या काळात मुंबईस पाकिस्तान म्हटले गेले. मुंबईचा अवमान करणाऱ्य़ा एका नटीच्या बेकायदेशीर बांधकामांवर महापालिकेने कारवाई करताच महापालिकेचा उल्लेख ‘बाबर’ असा करण्यात आला. मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रात भाजप उभा राहतो हे दुर्दैव आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.

‘राज ठाकरे हे सुद्धा महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेल्या ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,’ असं म्हणत राऊत यांनी राज ठाकरे यांनाही साद घातली आहे.

कुणीही उठावे आणि मुंबई-महाराष्ट्रावर चिखलफेक करावी हे आता तरी थांबले पाहिजे. दिल्ली किंवा महाराष्ट्रात कोणाचेही सरकार असो, एखादी अज्ञात शक्ती आमच्या मुंबईच्या विरोधात पद्धतशीरपणे कारस्थाने करत असते. महाराष्ट्राच्या रक्तातील मराठी पेशी मारण्याचे कारस्थान सुरू आहे. सूर्य, चंद्र असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे शब्द उच्चारताच वणव्याप्रमाणे पेटून उठणारा मराठी माणूस कायमचा लाचार करण्याचे षड्यंत्र नव्या राजकारणात रचले गेले आहे. मुंबईचे महत्त्व, मुंबईचे वैभव कमी केले की महाराष्ट्राचे आपोआप पतन होईल, असे ज्यांच्या मनात आहे ते मराठी माणसाला कमी लेखत आहेत,’ असा इशारा राऊत यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *