![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २४ डिसेंबर २०२५ | डिसेंबर आला की माणूस स्वेटर शोधतो. यंदा मात्र स्वेटरसोबत छत्रीही शोधावी लागणार असं हवामान खातं सांगतंय. कडाक्याची थंडी, त्यात पावसाची शक्यता – म्हणजे निसर्गाने “एकावर एक फ्री” ऑफर काढली आहे. पण ही ऑफर सामान्य माणसासाठी नाही, ती थेट त्रासासाठी आहे!
उत्तर भारतात बर्फ पडतोय, हिमालयात हिमवृष्टी सुरू आहे, आणि त्याचा शहारा थेट महाराष्ट्राच्या अंगावर येतोय. मराठवाडा, विदर्भ, घाटमाथा सगळीकडे थंड वारे सुटलेत. सकाळी उठल्यावर अंगावर चादर ओढायची इच्छा होते, पण ऑफिसला जायचं असतं. निसर्ग म्हणतो, “थांब”, आणि पगार म्हणतो, “चल!”
उत्तर महाराष्ट्रात तर पारा थेट एक अंकी. धुळे, निफाड, अहिल्यानगरमध्ये तापमान ५ ते ८ अंशांवर. ही थंडी नाही, तर थर्मामीटरची परीक्षा आहे. हात गोठतात, तोंडातून वाफ निघते, आणि चहा थंड होण्याआधी माणूसच थंड होतो.
मुंबई, ठाणे, पालघरमध्ये मात्र हवामानाचा वेगळाच खेळ. दिवसा ऊन, संध्याकाळी गारवा. म्हणजे सकाळी घाम, रात्री शहारे. कपडे बदलायचे की विचार, हा प्रश्नच उरलेला नाही. इथे माणूस नाही, हवामानच बायपोलर झालं आहे.
देशभरात परिस्थिती आणखी गंमतीशीर. उत्तर भारतात दाट धुके इतकं की माणूस समोरचा माणूस पाहू शकत नाही. दिल्लीमध्ये तर धुकं इतकं की विमानालाच वाटतं – “मी कुठे चाललोय?” ५०० विमाने उशिरा, १४ रद्द. प्रवासी विमानतळावर बसून हवामानाकडे बघतात आणि विचार करतात – “तिकीट घेतलं, पण नशीब घेतलं नव्हतं!”
हिमाचल, उत्तराखंड, काश्मीरमध्ये बर्फवृष्टी, पावसाचा इशारा, आणि “चिल्ला ए कलां”ची धडकी. सरकार म्हणतं, “दुर्गम भागात जाऊ नका.” नागरिक म्हणतात, “साहेब, आम्ही आधीच घरात अडकलोय.”एकीकडे हवामान खातं सतर्कतेचा इशारा देतं, दुसरीकडे सामान्य माणूस म्हणतो – “हिवाळा असो, पाऊस असो, धुकं असो… ऑफिस मात्र सुरूच असतं!”
शेवटी एवढंच खरं –
आभाळ कधी रडतंय, कधी थरथरतंय. पण माणूस मात्र रोज उठून म्हणतो – “काय करणार… जगायचंच आहे!”
