आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावी : खा. उदयनराजे भोसले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – सातारा – मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्‍न न्यायालयात प्रलंबित आहे. आरक्षण लागू होईपर्यंत, मराठा समाजाला विविध सवलती आणि योजना लागू कराव्या. त्यामुळे मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल. खास करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत, शिष्यवृत्ती, हॉस्टेलची सुविधा, नामांकित शाळांत गरीब आणि दुर्गम भागातील मराठा मुलांना  प्रवेश देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी सरकारकडे केली आहे.

खा. उदयनराजेंनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, प्रत्येक जिल्ह्यांच्या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावी. वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या मराठा विद्यार्थ्यानां स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना लागू करा. गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना नामांकित शाळांत प्रवेश मिळावा, ग्रामीण भागातील बेघर मराठा कुटुंबांना घरे मिळावीत.

सारथी संस्था सक्षम करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 हजार कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा. बेरोजगार पदवीधर युवक युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षापूर्व निवासी सवलती सारथीच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्या. मराठा समाजातील बेरोजगार युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेसह इतर परीक्षेसाठी परिक्षा शुल्कात आर्थिक सवलती लागू कराव्या, असेही खा. उदयनराजे यांनी म्हटले आहे.

समाजातील युवक युवतींना लष्करातील सैनिक भरती व राज्यातील पोलिस भरतीत आवश्यक ते मूलभूत प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. शेतकर्‍यांना शेतीपूरक व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज योजना लागू करावी. शेती आणि शेतकरी कुटुंबास विमा संरक्षण द्यावे, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा, आदी मागण्या उदयनराजेंनी केल्या आहेत.

आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. जोपर्यंत हा प्रश्‍न मार्गी लागत नाही. तोपर्यंत विविध सुविधांसह इतर समाजाप्रमाणे मराठ्यांसाठी बिनव्याजी कर्जाच्या योजना सुरू करून उद्योग-व्यवसायासाठी प्रोत्साहन द्यावे. बेरोजगार तरूण-तरूणींना भत्ता सुरू करावा, अशीही मागणी उदयनराजेंनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *