महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ सप्टेंबर – मुंबई : अत्यावश्यक सेवेत काम करत असूनही लॉकडाऊनमध्ये गेल्या चार-पाच महिन्यांपासून रेल्वेच्या लोकल प्रवासापासून वंचित असलेल्या वीज कामगारांना आता लोकलने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीसह महवितरण, महानिर्मिती आणि महापरेषण या कंपन्यांच्या कर्मचाऱयांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी म्हणून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन संचालकांनी रेल्वे बोर्डाला पत्र दिले आहे. त्यामुळे सदर कंपन्यांच्या वीज कर्मचाऱयांना दिलासा मिळणार आहे.
महावितरण, महापरेषण, महानिर्मिती या तिन्ही कीज कंपन्यांची मुख्य कार्यालये मुंबईत असून मुंबई उपनगराच्या काही भागासह ठाणे, पालघर आणि नकी मुंबई परिसरात महावितरणकडून वीज पुरवठा केला जात आहे. अत्यावश्यक सेवा असलेल्या विजेचा अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना कामाच्या ठिकाणी सहजपणे जाता यावे म्हणून वीज कंपन्यांनी आपल्या कामगारांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सरकारकडे केली होती. त्याची दखल घेत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन संचालकांनी चारही वीज कंपन्यांच्या कर्मचाऱयांना लोकलने प्रवास करण्याबाबत परवानगी द्यावी म्हणून रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना पत्र दिले आहे.