✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३१ डिसेंबर २०२५ | ‘अरबट चिखल, बरबट चिखल… अस्सा राडा सुरेख!’ राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी घडलेल्या प्रकारांना हे भोंडल्यातील विडंबन शब्दशः लागू पडले. सुसंस्कृत राजकारणाच्या गप्पा मारणाऱ्या पक्षांनी मंगळवारी राज्यभर जो गोंधळ घातला, तो पाहता निवडणूक प्रक्रिया आहे की राजकीय कुस्तीचा आखाडा, असा प्रश्न पडावा अशी स्थिती होती.
युती-आघाड्यांचे गणित अखेरपर्यंत न सुटल्याने उमेदवारीच्या आशेवर बसलेल्यांचा संयम सुटला. पक्ष कार्यालयांवर दगडफेक, तोडफोड, नेत्यांना शिवीगाळ, एबी अर्जाची पळवापळवी, वाहनांचा पाठलाग, तर काही ठिकाणी थेट हाणामारीपर्यंत मजल गेली. एका दिवसात राज्यभर जे घडले, ते लोकशाहीला शोभणारे नव्हते.
२९ महापालिकांच्या निवडणुका महायुती म्हणून लढवण्याची घोषणा करणाऱ्या भाजप–शिवसेनेत जागावाटप शेवटच्या क्षणापर्यंत रखडले. परिणामी तब्बल २२ महानगरपालिकांमध्ये हे दोन्ही मित्रपक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले. दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांनीही आपल्या सोयीप्रमाणे तडजोडी केल्याने कुठे कोण कोणासोबत आणि कोण कोणाविरोधात, हे चित्र मंगळवारी उशिरापर्यंत धूसरच राहिले.
तिकीट न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी क्षणात पक्ष बदलण्याचा सपाटा लावला. ठाण्यात दोन इच्छुकांनी अवघ्या तासाभरात दोन पक्ष बदलल्याची चर्चा रंगली. नाशिकमध्ये भाजप कार्यालयात इच्छुकांचा संताप अनावर झाला. एबी अर्ज घेऊन निघालेल्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा पाठलाग करण्यात आला, तर ज्या बंगल्यातून अर्ज वाटप झाले, त्याच्या प्रवेशद्वारावर लाथा मारून गोंधळ घालण्यात आला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या तीन महिला पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी न मिळाल्याने प्रचार कार्यालयातच राडा घातला. नवी मुंबईत भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी समर्थकांना डावलल्याचा आरोप करत स्वपक्षीयांवरच आगपाखड केली. मुंबईत ठाकरे गट आणि मनसे यांच्यात प्रथमच झालेल्या युतीनंतरही उमेदवारी न मिळालेल्यांनी अश्रू आणि संताप दोन्ही व्यक्त केले.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही उधाण आले. छत्रपती संभाजीनगरमध्ये युती तुटल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी भाजपवर दगाबाजीचा आरोप केला, तर मंत्री अतुल सावे यांनी त्याला प्रतिउत्तर दिले. नाशिकमध्ये परिस्थिती इतकी चिघळली की, पोलिस संरक्षणात एबी अर्ज द्यावे लागले आणि मंत्री गिरीश महाजन यांना स्वतः धाव घ्यावी लागली. दोन कोटी रुपये घेऊन उमेदवारी दिल्याचे आरोपही कार्यकर्त्यांकडून करण्यात आले.
मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये मात्र अखेर महायुती जुळली. भाजपने मराठी मतांच्या गणितासाठी शिंदे गटाला अधिक जागा देत तडजोड केली. मात्र नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिकसह अनेक शहरांत युतीच न झाल्याने सरळ लढती अटळ ठरल्या.
एकंदरीत, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यभर जे काही घडले, त्यातून राजकारणातील संयम, शिस्त आणि संस्कृती यांचीच खरी परीक्षा झाली — आणि ती अनेकांनी नापास झाल्याचेच चित्र समोर आले.
