Ladki Bahin Yojana: KYC ची मुदत संपली; लाडकी बहीण… पण KYCविना परकी!

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३१ डिसेंबर २०२५ | ‘लाडकी बहीण’ म्हणत सरकारने ज्या योजनेचा गाजावाजा केला, तीच योजना आता हजारो महिलांसाठी डोकेदुखी ठरताना दिसते आहे. कारण आज, ३१ डिसेंबर — ई-केवायसीची शेवटची तारीख. घड्याळाचे काटे पुढे सरकत असताना जवळपास ४५ लाख “लाडक्या बहिणी” अजूनही केवायसीच्या रांगेतच अडकलेल्या आहेत. प्रश्न एकच — या बहिणी आता अपात्र ठरणार का?

प्रशासनाचा सूर मात्र स्पष्ट आहे. “आता मुदतवाढ नाही.” म्हणजे जे आज केवायसी करतील, त्यांचे नशीब उजळेल; जे राहतील, त्यांच्यासाठी योजना इतिहासजमा! याआधी एकामागून एक मुदतवाढ देत लाभार्थींना दिलासा देणाऱ्या यंत्रणेने आता हात आखडता घेतला आहे. परिणामी, ‘लाडकी’ असण्याचा दर्जा केवळ कागदावर उरण्याची चिन्हे आहेत.

विशेष म्हणजे, या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे प्रकारही समोर आले आहेत. तब्बल ७ हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. आता त्यांच्या पगारवाढीवर गंडांतर येणार असून, घेतलेली रक्कम वसूल करण्याचीही तयारी सुरू आहे. म्हणजे ‘गरजूंसाठी योजना’ असं सांगून, लाभ मात्र नोकरदारांनी घेतल्याचं चित्र आहे. इथेच सामान्य महिलांचा प्रश्न उभा राहतो — आम्ही गरजू असूनही कागदात अडकलो आणि इतरांनी नियम धाब्यावर बसवले?

यात आणखी एक अट म्हणजे, केवळ महिलेचेच नव्हे, तर तिच्या पतीचे किंवा वडिलांचेही केवायसी अनिवार्य. कारण काय? तर उत्पन्नाची तपासणी! अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास, लाभ थांबणार. म्हणजे योजना महिलांच्या नावावर, पण चौकशी घरातल्या पुरुषांपर्यंत. पती किंवा वडील हयात नसतील, तर वेगळी प्रक्रिया आहे — पण ती माहिती किती महिलांपर्यंत पोहोचली, हा देखील संशोधनाचा विषयच.

आजच्या दिवसात केवायसी न झाल्यास पुढे संधी मिळणार नाही, हे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सेवा केंद्रांवर गर्दी, गोंधळ आणि तणावाचं वातावरण आहे. ‘लाडकी बहीण’ असणं आता भावना राहिलेली नाही, तर ते पूर्णपणे केवायसीवर अवलंबून आहे.

एकंदरीत काय, तर योजना लाडकी असली, तरी नियम बेदर्द आहेत. ज्यांच्याकडे वेळ, माहिती आणि साधनं आहेत, त्या वाचतील. उरलेल्यांसाठी मात्र हा शेवटचा दिवस — आणि शेवटची संधी. कारण सरकारच्या फाइलमध्ये भावना नसतात, तिथे फक्त KYC असतं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *