![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३१ डिसेंबर २०२५ | कोकण हाऊसफुल्ल! २५ डिसेंबरपासून सलग सुट्ट्या, खिशात थोडी उसंत आणि मनात ‘न्यू इयर कुठे साजरं करायचं’ हा प्रश्न — उत्तर मात्र ठरलेलं; कोकण! परिणामी रायगड जिल्ह्यात पर्यटकांची अक्षरशः लाट उसळली असून, रस्ते हे प्रवासासाठी की पार्किंगसाठी, असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे.
मांडवा, अलिबाग, किहीम, नागाव, काशिद, मुरुड, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, माथेरान, रायगड किल्ला — जिथे नजर जाईल तिथे मुंबई-पुणे नंबरच्या गाड्या! ‘कोकण शांत आहे’ ही जुनी जाहिरात आता इतिहासजमा झाली आहे. अरुंद रस्ते, वळणावळणाचे घाट आणि त्यावर एकाच वेळी हजारो खासगी वाहने — म्हणजे वाहतूक कोंडीला निमंत्रणच.
ही परिस्थिती ओळखून (उशिरा का होईना!) जिल्हा प्रशासनाने अखेर ब्रेक लावला आहे. ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत रायगड जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवर जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उद्देश एकच — पर्यटकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि स्थानिकांचा संयम संपण्याआधी वाहतूक कोंडी कमी व्हावी.
जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ११५ आणि ११६ अन्वये हे आदेश जारी केले आहेत. ही बंदी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून १ जानेवारी २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. आदेशांची अंमलबजावणी पोलीस, आरटीओ आणि तहसील प्रशासनावर सोपवण्यात आली आहे — म्हणजे कागदावर सगळं व्यवस्थित!
अर्थात, जीवनावश्यक सेवा मात्र या बंदीपासून मुक्त आहेत. दूध, पेट्रोल, डिझेल, गॅस, भाजीपाला, पाणी, औषधे, ऑक्सिजन तसेच रुग्णवाहिका, पोलीस व अग्निशमन दलाची वाहने सुरूच राहणार आहेत. कारण पर्यटन महत्त्वाचं असलं, तरी पोटाची भूक आणि जीवाची गरज त्याहून मोठी!
ही बंदी विशेषतः मुंबई–गोवा महामार्गावरील खारपाडा ते कशेडी, वडखळ–अलिबाग मार्ग, अलिबाग–मांडवा, अलिबाग–मुरुड, माणगाव–ताम्हाणी घाट, चौक–कर्जत अशा प्रमुख मार्गांवर लागू असणार आहे. याच रस्त्यांवर दरवर्षी ‘न्यू इयर स्पेशल’ कोंडी अनुभवायला मिळते.
गेल्या काही दिवसांपासून या मार्गांवर वाहनांची रांग इतकी वाढली आहे की, प्रवासाचा आनंद कमी आणि हॉर्नचा त्रास जास्त, अशी अवस्था झाली होती. अवजड वाहतूक थांबवल्यास किमान हलक्या वाहनांचा तरी श्वास मोकळा होईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.
एकंदरीत काय, तर कोकण नववर्षासाठी सज्ज आहे, पर्यटक आलेत, गर्दी झालीय… आता फक्त प्रशासनाचं नियोजन रस्त्यावर उतरलं, तर ‘हाऊसफुल्ल’चा गोंधळ ‘हॅपी न्यू इयर’मध्ये बदलेल!
