महाराष्ट्र 24 – पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी- निवडणूक जवळ आली की काही नेत्यांना अचानक समाजाची आठवण येते, कार्यक्रमांची गर्दी जमवली जाते आणि पाठिंब्याचे फलक झळकू लागतात. मात्र ही गर्दी खरी की दिखाऊ, हा प्रश्न आता खानदेशी समाजच विचारू लागला आहे. पराभव समोर दिसू लागल्याने नामदेव ढाके यांचा तोल ढासळला असून, समाजाच्या नावावर संभ्रम निर्माण करण्याचे राजकारण त्यांनी थांबवावे, असा खरमरीत हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रभाग क्रमांक १७ चे उमेदवार **रवींद्र महाजन** यांनी केला.
“खानदेशी माळी समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी समाजाच्या भावनांवर नाही, तर विकासाच्या आराखड्यावर निवडणूक लढवत आहे. गेल्या वीस वर्षांत नामदेव ढाके यांनी खानदेशी समाजाला काय दिले, हा प्रश्न आज रस्त्यावरचा माणूस विचारतोय आणि त्याच प्रश्नाचे उत्तर न देता ते भावनिक कार्यक्रमांचा आधार घेत आहेत,” असा टोला महाजन यांनी लगावला.
महाजन पुढे म्हणाले, “२०-२५ लोकांना एका मंचावर बसवून समाज आपल्या सोबत आला, असे सांगणे म्हणजे समाजाच्या बुद्धिमत्तेचा अपमान आहे. निवडणूक आली की घरे पाडण्याची भीती दाखवायची, समाजाच्या नावावर राजकीय धंदा करायचा आणि निवडणूक संपली की समाजाला विसरायचे – हे जुने नाटक आता बंद झाले पाहिजे.”
“खानदेशी माळी समाजासह इतरही समाजघटकांनी मला प्रामाणिक पाठिंबा दिला आहे. कारण मी घोषणांचा नव्हे, तर कामाचा हिशेब मांडतो. खोटे दावे करून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ढाके यांनी करू नये, जनता आता हुशार झाली आहे,” असा स्पष्ट इशाराही महाजन यांनी दिला.
दरम्यान, ढाके समर्थकांकडून माळी समाजाचा पाठिंबा असल्याचे दावे केले जात असतानाच, माळी समाजाकडूनच या दाव्यांना सुरुंग लागला आहे.
# *समाजाच्या नावावर राजकारण खपणार नाही – हनुमंत माळी*
“नामदेव ढाके यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माळी समाजाने कोणत्याही उमेदवाराला अधिकृत पाठिंबा दिलेला नाही,” असा ठाम खुलासा **महात्मा जोतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष व माळी समाजाचे ज्येष्ठ नेते हनुमंत माळी** यांनी केला.
पाठिंबा दिल्याचा गाजावाजा ज्या कार्यक्रमाबाबत केला जात आहे, त्या कार्यक्रमाची समाजाला काडीमात्र माहिती नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
