![]()
महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी | दि. ६ | महाराष्ट्राच्या हवामानाने पुन्हा एकदा सर्वसामान्यांना गोंधळात टाकलं आहे. पहाटे आणि रात्री उशिरा बोचरा गारठा, मधल्या वेळेत ढगाळ वातावरण आणि एखाद्या क्षणी पावसाची हजेरी, तर दुपार होताच उन्हाचा तडाखा—असं विचित्र चित्र सध्या राज्यभर पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये किमान तापमान ५ ते ६ अंशांपर्यंत घसरलेलं असतानाच, आता मात्र हळूहळू तापमानात वाढ होऊ लागली आहे. परिणामी किमान आणि कमाल तापमानातील तफावत अधिक ठळकपणे जाणवत असून, पुढील २४ तासांत हवामान आणखी अनिश्चित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या हवामान बदलामागे देशाच्या उत्तर आणि दक्षिण भागातील परस्परविरोधी स्थिती कारणीभूत ठरत आहे. उत्तरेकडे थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना, दक्षिण भारतात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केला असून, त्याचा थेट परिणाम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील घाटमाथ्यावरील भागांत दाट धुक्याची चादर कायम राहणार असून, ती विरळ होण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो. यामुळे सकाळच्या वेळेत दृश्यमानता कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विदर्भातील नागपूर, अमरावती, गोंदिया तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत पुढील दोन दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे, तामिळनाडू आणि केरळसारख्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची हजेरी लागण्याची चिन्हं दिसत आहेत. लक्षद्वीप आणि मालदीव परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही स्थिती निर्माण झाली असून, त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या हवामानावरही उमटताना दिसत आहेत. अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे दाखल झाल्यास कोकणापासून सांगलीपर्यंत ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, पश्चिम हिमालयीन भागांत पुढील काही दिवसांत हवामान अधिक कठोर होण्याची चिन्हं आहेत. जम्मूपासून शिमला, तसेच पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये दाट धुके, हलका पाऊस आणि हिमवर्षाव वाढण्याचा अंदाज आहे. पर्वतीय भागांमध्ये तापमानात लक्षणीय घट होण्याची शक्यता असून, पुढील सात दिवसांत थंडीचा कडाका आणखी तीव्र होणार आहे. पाऊस, हिमवर्षाव आणि धुक्यामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
