व्हायरल न्यूज : मार्च २०२६ पासून ५०० ची नोट बंद? या व्हायरल दाव्यामागचं सत्य काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 – विशेष प्रतिनिधी | दि. ६ | सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा रंगली आहे—मार्च २०२६ पासून ५०० रुपयांची नोट बंद होणार, एटीएममधून ५००ची नोट मिळणार नाही. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर हा मेसेज इतक्या वेगानं व्हायरल झाला की अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. रोजच्या व्यवहारात सर्वाधिक वापरली जाणारी ५०० रुपयांची नोट अचानक बंद होणार असल्याच्या दाव्यामुळे अनेकांनी रोख रक्कम, बचत आणि व्यवहारांबाबत चिंता व्यक्त केली. पण खरंच सरकार किंवा आरबीआयनं असा काही निर्णय घेतलाय का, हा प्रश्न उपस्थित होताच ‘व्हायरल सत्य’ टीमनं या दाव्याची सखोल पडताळणी सुरू केली.

व्हायरल पोस्टमध्ये असं म्हटलं जात आहे की, १ मार्च २०२६ पासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ५०० रुपयांच्या नोटांचं वितरण थांबवण्याचा निर्णय घेतलाय आणि हळूहळू या नोटा चलनातून पूर्णपणे बाहेर काढल्या जातील. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली. कारण नोटबंदीच्या अनुभवानंतर अशा अफवांवर लोक पटकन विश्वास ठेवतात. त्यामुळे सत्य काय आहे, हे तपासणं गरजेचं होतं. सर्वप्रथम आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरील परिपत्रकं, अधिसूचना आणि प्रेस रिलीज तपासण्यात आले. मात्र, ५०० रुपयांच्या नोटांबाबत कोणताही नवीन निर्णय, बंदी किंवा वितरण थांबवण्याची माहिती कुठेही आढळून आली नाही.

पडताळणीदरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली—भारत सरकारच्या ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’नं (PIB) स्वतः या व्हायरल मेसेजची दखल घेतली आहे. PIB Fact Check द्वारे स्पष्ट करण्यात आलं आहे की, “१ मार्च २०२६ पासून ५०० रुपयांची नोट बंद होणार” किंवा “एटीएममधून ५००ची नोट मिळणार नाही” हा दावा पूर्णपणे असत्य आहे. आरबीआयनं अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही. सध्या ५०० रुपयांची नोट हे देशातील सर्वात मोठं आणि वैध चलन असून, ती कायदेशीररित्या व्यवहारात वापरता येते.

थोडक्यात सांगायचं झालं, तर ५०० रुपयांची नोट बंद होणार असल्याचा मेसेज हा निव्वळ अफवा पसरवण्यासाठी व्हायरल करण्यात आला आहे. सरकार किंवा आरबीआयकडून नोटबंदी किंवा नोट बदलाबाबत कोणताही निर्णय झाल्यास, तो अधिकृत माध्यमातूनच जाहीर केला जातो. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा अप्रामाणिक मेसेजवर विश्वास ठेवू नका, इतरांनाही सतर्क करा. रोख व्यवहारांबाबत घाबरण्याचं कोणतंही कारण नाही—५०० ची नोट पूर्णपणे वैध आहे आणि व्यवहारासाठी सुरूच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *