Census 2027 India: जनगणना 2027 चा बिगुल—आता सरकार तुमचं दार नाही, मोबाईल ठोठावणार : पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ८ | भारतामध्ये सरकार नागरिकांपर्यंत पोहोचतं, की नागरिक सरकारपर्यंत—यावर नेहमीच वाद होत आला आहे. पण जनगणना 2027 ने हा वादच संपवला आहे. 1 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात सरकार थेट तुमच्या घरात डोकावणार आहे—अर्थात आकड्यांच्या वहीसह! घरनोंदणी, बांधकामाचा प्रकार, पाणी, वीज, शौचालय, इंधन अशा मूलभूत सुविधांची मोजदाद होणार आहे. व्यक्ती नाही, मत नाही, मतदार नाही—फक्त घर! “या टप्प्यात माणूस गौण आहे, छप्पर महत्त्वाचं!” 2011 नंतर तब्बल दीड दशकांनी सुरू होणारी ही प्रक्रिया देशासाठी केवळ प्रशासकीय नव्हे, तर ऐतिहासिक ठरणार आहे.

पहिला टप्पा 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान राबवला जाणार असून, दुसरा टप्पा—खरी कसोटी—फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार आहे. तेव्हा घरात किती माणसं आहेत, कोण काय करतो, कोण शिकलेलं, कोण बेरोजगार, कोण कुठल्या सामाजिक गटात—सगळी कुंडली सरकारकडे जमा होणार आहे. विशेष म्हणजे, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जातनिहाय आकडेवारी राष्ट्रीय पातळीवर संकलित केली जाणार आहे. हा निर्णय म्हणजे राजकारणात पेट्रोल ओतल्यासारखा आहे. आकडे आले, की चर्चा होणारच; चर्चा झाली, की राजकारण रंगणारच. जनगणना ही केवळ मोजणी नसून, ती पुढील दशकाची राजकीय नकाशा आखणारी प्रक्रिया असते, हे विसरून चालणार नाही.

यंदाची जनगणना आणखी एका कारणामुळे वेगळी आहे—डिजिटल जनगणना! जनगणना अधिकारी येण्याआधीच नागरिकांना ‘सेल्फ-एन्युमरेशन’चा पर्याय दिला जाणार आहे. म्हणजे आता “आम्ही घरी नव्हतो” ही सबब चालणार नाही. मोबाईल अ‍ॅपवर माहिती भरा, बटण दाबा आणि नागरिकत्वाची जबाबदारी पार पाडा! सरकार म्हणतंय, “तुम्ही स्वतःच स्वतःला मोजा.”, “पूर्वी सरकार लोकांना मोजायचं, आता लोक स्वतःची मोजदाद करतील—पण आकडे सरकारचेच!” 11,718 कोटी रुपयांचा खर्च मंजूर झालेला हा उपक्रम म्हणजे आकड्यांवरचा सर्वात महागडा पण महत्त्वाचा प्रयोग आहे.

2021 ची जनगणना कोरोना महामारीमुळे रखडली, आणि देश आकड्यांच्या बाबतीत जुन्याच नकाशावर चालत राहिला. आता 2027 ही केवळ जनगणना नाही, तर रीसेट बटण आहे. योजना, निधीवाटप, आरक्षण, विकास—सगळ्याचा पाया या आकड्यांवर ठरणार आहे. त्यामुळे जनतेनंही याकडे केवळ सरकारी औपचारिकता म्हणून पाहू नये. कारण शेवटी सत्य एकच—तुमची नोंद जशी, तशीच तुमची गणना; आणि गणना जशी, तसाच तुमचा वाटा! जनगणनेचा हा खेळ शांत असतो, पण त्याचे परिणाम पुढील दहा वर्षं गाजत राहतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *