![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १० | लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी जानेवारी महिना अत्यंत आनंदाचा ठरणार आहे. मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त राज्य सरकारकडून महिलांना मोठं गिफ्ट मिळणार असून, थेट त्यांच्या खात्यात ₹३००० जमा होणार आहेत. डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार आहे. या घोषणेमुळे राज्यभरातील लाडक्या बहिणींमध्ये उत्साहाचं वातावरण असलं, तरी दुसरीकडे काही महिलांसाठी ही बातमी निराशाजनक ठरण्याची शक्यता आहे.
कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणं बंधनकारक आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे केवायसी (KYC). शासनाने स्पष्ट केलं आहे की, केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित पैसे फक्त त्याच महिलांच्या खात्यात जमा होतील, ज्यांनी वेळेत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. केवायसी न केल्यास लाभ थेट बंद केला जाणार असल्याने अनेक महिलांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र, या मुदतीपर्यंत लाखो महिलांनी केवायसी पूर्ण केलेली नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंदाजे ३० लाखांहून अधिक महिलांची केवायसी अपूर्ण असल्याने त्यांना मकरसंक्रांतीला मिळणारे ₹३००० मिळणार नाहीत. विशेष म्हणजे, अनेक महिलांना केवायसीची अंतिम तारीख, आवश्यक कागदपत्रे किंवा प्रक्रियेबाबत पुरेशी माहिती न मिळाल्यामुळे हा लाभ गमवावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याशिवाय, उत्पन्नाच्या निकषात न बसणाऱ्या महिलांचाही लाडकी बहीण योजनेतील लाभ बंद केला जाणार आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा जास्त आहे, त्या महिलांची माहिती तपासणीदरम्यान उघड होणार आहे. महिलांसोबतच त्यांच्या पती किंवा वडिलांची केवायसी अनिवार्य करण्यात आली असून, या माध्यमातून कुटुंबाचे प्रत्यक्ष उत्पन्न समोर येणार आहे. उत्पन्न मर्यादा ओलांडल्याचे आढळल्यास, अशा महिलांचा लाभ थेट रद्द केला जाणार आहे. त्यामुळे मकरसंक्रांतीला ₹३००० मिळणार की नाही, हे पूर्णपणे केवायसी आणि उत्पन्न निकषांवर अवलंबून असणार आहे.
