थंडीचा कडाका आणि आपण : अंगावर शहारा, मनात प्रश्न!

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ११ | राज्यात सध्या सुरू असलेला थंडीचा खेळ म्हणजे जणू निसर्गानेच “हॉट अ‍ॅण्ड कोल्ड” खेळायला सुरुवात केली आहे. कधी सकाळी अंग गोठवणारी थंडी, तर दुपारी उन्हाची हलकीशी झळ — आणि संध्याकाळी पुन्हा गार वाऱ्यांची चाहूल. उत्तर दिशेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी महाराष्ट्राला अक्षरशः शहारा आणला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात थंडीचा कडाका इतका वाढलाय की लोकरी कपड्यांनी कपाटातून थेट अंगावर उडी मारली आहे. हवामान खातं सांगतंय, “थांबा जरा, अजून खेळ बाकी आहे!”

धुळे, परभणी, निफाडसारख्या भागांत तापमान ६ ते ७ अंशांपर्यंत घसरलं, हे ऐकून पुणेकरांनी कॉलर वर केली, नागपूरकरांनी हातमोजे शोधले आणि ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी आकाशाकडे काळजीने पाहिलं. अहिल्यानगर, जेऊर, नाशिक, जळगाव, गोंदिया, भंडारा — सगळीकडेच थंडीचा दबदबा. “ही थंडी आहे की परीक्षेचा निकाल?” असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येणं साहजिकच आहे. कारण रोज तापमान बदलतंय, आणि शरीराला समजत नाही — आज आजारी पडायचं की उद्या!

या तापमानाच्या लहरीपणाचा फटका सगळ्यात जास्त बसलाय तो शेतकऱ्यांना. कधी गारठा, कधी कोरडी हवा — पिकं गोंधळलीत, आणि शेतकरीही. भाजीपाला, फळबागा, गहू-हरभऱ्यासारखी पिकं या बदलत्या हवामानात तग धरतील का, हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे, सर्दी-खोकला, ताप, अंगदुखी यांसारखे आजार घराघरांत पोहोचले आहेत. डॉक्टरांचं म्हणणं एकच — “हवामान बदलतंय, तुम्ही तरी बदलू नका, काळजी घ्या!”

या सगळ्यामागे बंगालच्या उपसागरातील डीप डिप्रेशन वादळाचाही अप्रत्यक्ष हात आहे. श्रीलंकेजवळ घोंघावणारं वादळ थेट महाराष्ट्रात येणार नसलं, तरी त्याची सावली आपल्या हवामानावर पडतेय. निसर्ग जणू आपल्याला सांगतोय — “मी बदलतोय, तुम्हीही शहाणे व्हा.” उबदार कपडे, योग्य आहार, आरोग्याची काळजी आणि थोडी सतर्कता — एवढंच या थंडीवरचं उत्तर आहे. नाहीतर थंडी फक्त अंगालाच नाही, तर आयुष्यालाही गारठवेल, आणि मग दोष द्यायला फक्त हवामानच उरेल!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *