महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ११ | ॲशेस म्हणजे केवळ क्रिकेट मालिका नाही, ती दोन क्रिकेट संस्कृतींमधली युद्धकथा आहे. एकीकडे शिस्त, संयम आणि परिस्थितीनुसार खेळणारी ऑस्ट्रेलिया; तर दुसरीकडे “पहिल्या चेंडूपासून हल्ला” अशी बॅझबॉलची ढाल उचललेली इंग्लंड. मैदानं हाउसफुल, प्रेक्षक रोमांचित आणि कसोटी क्रिकेट जिवंत असल्याचा आनंद सगळीकडे होता. पण निकालाने एक गोष्ट ठाम सांगितली — कसोटी क्रिकेट लोकप्रिय होत असलं, तरी बेफाम आक्रमकतेला अजूनही मर्यादा आहेत. ऑस्ट्रेलियाने ४-१ असा ॲशेस राखत बॅझबॉलचा अक्षरशः बँडबाजा वाजवला.
विशेष म्हणजे हा विजय ‘फुल टीम’शिवाय मिळाला. पॅट कमिन्स फक्त एक कसोटी खेळला, जॉश हेझलवूड तर मालिकेलाच मुकला. तरीही ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला शह देत दाखवली. दुसरीकडे ब्रँडन मॅकलम–बेन स्टोक्स यांची जोडी कसोटी क्रिकेटचं तत्त्वज्ञान बदलायला निघाली होती. कसोटीतही टी-२०चा आत्मा ओतायचा, हाच बॅझबॉलचा गाभा. सुरुवातीला हा प्रयोग आकर्षक वाटला; पण ॲशेससारख्या मालिकेत निकालच आरसा ठरतो. २०२२ पासून भारत-ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचा बॅझबॉल रेकॉर्ड पाहिला, तर प्रयोगशाळेतील उंदीर आणि रणांगणातील योद्धा यातला फरक स्पष्ट दिसतो.
कसोटी क्रिकेट आज आक्रमक झालंय, हे मान्य. सामने निकाली लागतायत, खेळ रटाळ राहिलेला नाही. पण आक्रमकता ही परिस्थितीची गुलाम असते, हट्टाची नव्हे. ढगाळ वातावरण, स्विंग, उसळ — अशा वेळी प्रत्येक चेंडूवर फटका मारणं म्हणजे स्वतःचं शस्त्र स्वतःवर चालवणं. भारतात जयस्वाल-बुमरा यांनी, ऑस्ट्रेलियात हेड-कमिन्स यांनी हेच सिद्ध केलं. इंग्लंडच्या सलामीवीरांची “कसंही खेळू” मानसिकता, मधल्या फळीतील प्रतिभा असूनही संघाला तारू शकली नाही. जो रूटची शतके आली, पण सामन्यांची दिशा बदलली नाही. कारण कसोटीत फक्त रन नव्हे, वेळ, संयम आणि प्रसंगही जिंकावे लागतात.
— कसोटी क्रिकेट म्हणजे नाटक आहे; प्रत्येक अंकात वेगळी भूमिका असते. सगळ्या अंकात फक्त विदूषक बनून चालत नाही. इंग्लंडला क्रिकेटचे जनक म्हटलं जातं, पण सध्या त्यांनाच आपल्या मूळ तत्त्वांची आठवण करून देण्याची वेळ आली आहे. बॅझबॉल हा पर्याय असू शकतो, धर्म नाही. ऑस्ट्रेलियाने ॲशेस जिंकली; पण इंग्लंडसाठी हा पराभव इशारा आहे — कसोटी क्रिकेट बदललंय, पण ते अजूनही मेंदूने खेळायचं असतं, केवळ बॅटने नाही.
