![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १३ जानेवारी | ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोन्यानं असा काही उंच उडी मारलीय की वधूच्या गळ्यात हार कमी आणि घशात गोळा जास्त अडकतोय! प्रति तोळा दीड लाखाच्या दिशेने धावणारं सोनं आणि किलोमागे अडीच लाख ओलांडणारी चांदी पाहून सामान्य माणूस विचारात पडलाय—“हे दागिने आहेत की पंचतारांकित गुंतवणूक?” कालपर्यंत ‘सोनं म्हणजे सुरक्षितता’ म्हणणारे आज ‘सोनं म्हणजे धाडस’ असं म्हणायला लागलेत. बाजारात भाव वाढले की कारणं तयार असतात—युद्ध, तणाव, टॅरिफ, फेड, ट्रम्प… थोडक्यात काय, जगात कुठेही बॉम्ब पडो, पण सोन्याचा भाव इथे उसळतोच!
जगभर युद्धखोर नेत्यांची मिरवणूक सुरू आहे. रशिया-युक्रेन, मध्यपूर्व, अमेरिका-चीन—हे सगळे शब्द आता बातम्यांमध्ये कमी आणि सोन्याच्या दुकानात जास्त ऐकू येतात. अमेरिकेची युद्धखोर भूमिका, टॅरिफ वॉरची धमकी आणि शेअर बाजारातला अस्थिरपणा पाहून गुंतवणूकदार म्हणतो, “शेअर म्हणजे झोप न लागणारी गुंतवणूक; सोनं म्हणजे निवांत झोप.” मध्यवर्ती बँका स्वतः सोनं साठवू लागल्या, मग सामान्य माणूस तरी मागे कसा राहील? फेडने व्याजदर कमी केले, आणि सोनं चमकलं—जणू काही सोन्याला अमेरिकेची मान्यता मिळाली!
चांदीची कथा तर अजूनच रंजक आहे. पूर्वी चांदी म्हणजे पूजा, वाटी आणि करंडा; आता ती उद्योगांची लाडकी झाली आहे. इलेक्ट्रिक वाहनं, सोलर पॅनल्स, आधुनिक तंत्रज्ञान—सगळीकडे चांदीचा वापर वाढतोय आणि भावही त्याच वेगानं चढतोय. “सोनं श्रीमंतांचं, चांदी मध्यमवर्गीयांचं” हा जुना समज आता इतिहासजमा होतोय. चांदी इतकी महागलीय की तिलाही आता ‘इन्व्हेस्टमेंट’ म्हणूनच वागवलं जातंय, शोभेची वस्तू म्हणून नाही.
मात्र प्रश्न साधा आहे—इतक्या भावात गुंतवणूक करावी का? तज्ज्ञ सांगतात, घाबरू नका; पण अंध होऊ नका. एकूण गुंतवणुकीपैकी दहा-पंधरा टक्के सोनं-चांदीत ठेवा, बाकी डोळसपणे वाटून घ्या. दागिने, नाणी, ईटीएफ, गोल्ड बॉण्ड—पर्याय अनेक आहेत, पण हव्यास एकच नसावा. 2026 मध्ये सोनं दीड लाख पार करेल, असं भाकीत आहे; पण भाकितं आणि वास्तव यात नेहमीच अंतर असतं. सोनं-चांदी सुरक्षित आश्रय देतात, हे खरं; पण सगळं आयुष्य त्यांच्याच सावलीत घालवणं शहाणपणाचं नाही. सोनं चमकतंय—पण गुंतवणूक करताना आपली अक्कल त्याहून जास्त चमकली पाहिजे, एवढंच अंतिम सत्य!
