![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १८जानेवारी | पुणेकरांनो, सोमवारी घराबाहेर पडण्याआधी दोनदा विचार करा! कारण पुणे शहरात ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा धडाका बसणार आहे. जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या स्पर्धेमुळे शहरातील मध्यवर्ती भाग अक्षरशः ठप्प होणार आहे. एफसी रोड, जेएम रोड, युनिव्हर्सिटी रोडसारखे पुण्याचे ‘नस-नसा’ मानले जाणारे रस्ते सोमवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. म्हणजे काय तर – पुण्याचा सोमवार हा सायकलस्वारांचा आणि पुणेकरांचा संयम पाहणारा दिवस ठरणार!
सह पोलिस आयुक्त रंजन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान ही स्पर्धा रंगणार असून सोमवारी ‘प्रोलॉग रेस’ असल्याने विशेष कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. स्पर्धक तब्बल ६० ते ७० किलोमीटर प्रतितास वेगाने सायकल चालवणार असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्ते पूर्णपणे मोकळे ठेवले जाणार आहेत. याचा थेट परिणाम म्हणजे – वाहतूक वळवली जाणार, काही मार्ग पूर्ण बंद आणि काही ठिकाणी फक्त अत्यावश्यक वाहनांनाच परवानगी.
याच पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी एक महत्त्वाची माहिती दिली – सोमवारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर होणार आहे. पीएमसीच्या ९ वॉर्डांमधील शैक्षणिक संस्थांना आधीच सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर, विद्यापीठ परिसर, डेक्कन, संचेती परिसरात नागरिकांनी शक्यतो जाणे टाळावे, असा थेट सल्लाच पोलिसांनी दिला आहे. “खासगी वाहन नको, सार्वजनिक वाहतूक वापरा,” असा स्पष्ट संदेश प्रशासनाचा आहे.
आता मुद्दा महत्त्वाचा – कोणते रस्ते टाळायचे? खंडूजी बाबा चौक ते गुडलक चौक, गरवारे पूल, गुडलक चौक ते चाफेकर चौक, चाफेकर चौक ते रेंज हिल्स, रेंज हिल्स ते संचेती चौक आणि संचेती हॉस्पिटल ते डेक्कन जिमखाना – हे सर्व मार्ग सोमवारी ‘नो एन्ट्री’ झोन असतील. पर्याय म्हणून स्वारगेट किंवा कोथरुडहून शिवाजीनगरकडे जाताना अलका चौक, एसबी रोड किंवा भिडे ब्रिज वापरा. विद्यापीठ किंवा खडकीकडून डेक्कनला जायचे असल्यास जुना मुंबई–पुणे महामार्ग, संगमवाडी किंवा रेंज हिल्स मार्ग निवडा.
थोडक्यात काय, सोमवारी पुणेकरांनी गती कमी, संयम जास्त आणि मार्ग निवडताना शहाणपण वापरले नाही, तर सायकल रेस पाहण्याऐवजी ट्रॅफिक जामचा अनुभव घ्यावा लागेल. पुणे सायकलस्वारांसाठी सजले आहे, पण सामान्य नागरिकांसाठी हा दिवस ‘टेस्ट मॅच’ ठरणार, हे मात्र नक्की!
