![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २३ जानेवारी | देशातील सर्वाधिक व्यग्र आणि वेगवान प्रवास मार्गांपैकी एक असलेल्या पुणे–मुंबई हेलिकॉप्टर सेवेचा प्रवास अलीकडेच बदलला आहे. नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ २५ डिसेंबरपासून कार्यान्वित झाल्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने या मार्गात फेरबदल केले. परिणामी, हेलिकॉप्टरला आता थेट मार्गाऐवजी वळसा घ्यावा लागत असून प्रवासाचा कालावधी सुमारे १२ मिनिटांनी वाढला आहे. या बदलाचा थेट परिणाम भाड्यावर झाला असून पुणे–मुंबई–पुणे या फेऱ्यासाठी तब्बल ७० हजार रुपयांची वाढ झाली आहे.
नवीन मार्गानुसार हेलिकॉप्टरला जुहू, महालक्ष्मी किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. जुहू–नवी मुंबई–पुणे किंवा पुणे–नवी मुंबई–जुहू अशा मार्गांवरून उड्डाण करताना काही वेळ नवी मुंबई विमानतळाजवळील ‘होल्डिंग एअरस्पेस’मध्ये प्रतीक्षा करावी लागते. कर्नाला किल्ला, खारघर, डी. वाय. पाटील स्टेडियम, अटल सेतू, शिवडी रेल्वे स्थानक अशा अनेक ठिकाणांवरून हा प्रवास होतो. उड्डाणाची उंची ४ हजार ते ४ हजार ४०० फूट इतकी ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे सुरक्षितता राखली जात असली तरी अंतर मात्र वाढले आहे.
पूर्वी सहा आसनी हेलिकॉप्टरसाठी पुणे–मुंबई–पुणे प्रवासाचे भाडे (विनाजीएसटी) ३ लाख ८० हजार रुपये होते. नवीन मार्गामुळे हेच भाडे आता ४ लाख ५० हजार रुपयांपर्यंत गेले आहे. या दरात दोन तासांचा थांबा समाविष्ट असला तरी दुहेरी प्रवासासाठी सरासरी ७० हजार रुपयांची वाढ स्पष्टपणे जाणवते. विशेष म्हणजे, नवी मुंबई विमानतळाची धावपट्टी क्रमांक २६ वापरात असल्यास महालक्ष्मी मार्ग बंद ठेवण्यात येतो आणि भाऊचा धक्का–बुचर आयलंड–द्रोणागिरी–राणसाई धरण हा पर्यायी मार्ग वापरावा लागतो.
भाडेवाढ आणि वाढलेला प्रवासकाल असूनही प्रवाशांचा प्रतिसाद मात्र कायम आहे. “हेलिकॉप्टर प्रवास हा सुरक्षित, जलद आणि वेळ वाचवणारा असल्याने प्रवासी त्यालाच प्राधान्य देतात,” असे कैगु एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ईश्वरचंद्र गुलगुले सांगतात. वाढत्या वाहतुकीच्या कोंडीत, थोडी महाग असली तरी आकाशमार्गे होणारी ही झेप अनेकांसाठी अजूनही सर्वोत्तम पर्याय ठरत आहे.
