Anthropic Claude Cowork Tool: एका AI अपडेटनं IT विश्व ढवळून निघालं! २४ तासांत २ लाख कोटींची धूळधाण; नोकऱ्यांवर काळं ढग?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. ८ फेब्रुवारी २०२६ || भारतीय IT क्षेत्रावर अचानक संकटाचं सावट पसरलं आहे. एका AI टूलच्या अपडेटनं अवघ्या २४ तासांत शेअर बाजारात असा भूकंप घडवला की गुंतवणूकदार हादरून गेले. निफ्टी IT निर्देशांक तब्बल ६ टक्क्यांनी कोसळला आणि IT कंपन्यांच्या सुमारे २ लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्याचा चुराडा झाला. कोविड काळातील मार्च २०२० नंतरची ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. अमेरिकन बाजारात सॉफ्टवेअर शेअर्स पडले आणि त्याचे हादरे थेट मुंबईपर्यंत पोहोचले. बुधवारी व्यवहार संपेपर्यंत IT कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल ३० लाख कोटींच्या खाली घसरलं. “हे केवळ शेअर घसरणीचं प्रकरण नाही, तर संपूर्ण IT व्यवसाय मॉडेलवर प्रश्नचिन्ह उभं करणारा धक्का आहे,” अशी भावना बाजारात उमटू लागली.

या वादळाच्या केंद्रस्थानी आहे अमेरिकन AI स्टार्टअपकडून लाँच करण्यात आलेलं एक नवं टूल. हे साधन केवळ प्रश्नांची उत्तरं देणारा चॅटबॉट नसून, थेट संगणकावर काम करणारा डिजिटल सहकारी आहे. फायली वाचणं, कागदपत्रं संपादित करणं, फोल्डर्स मॅनेज करणं, स्क्रीनशॉटवरून स्प्रेडशीट तयार करणं, रफ नोट्सचे रिपोर्ट्स बनवणं—हे सगळं काही मिनिटांत! विशेष म्हणजे, कायदेशीर आणि व्यावसायिक कागदपत्रांसाठी वेगळं मॉड्यूल उपलब्ध करून देण्यात आलं आहे. म्हणजेच, जे काम आज हजारो IT कर्मचारी, डेटा अ‍ॅनालिस्ट, लीगल सपोर्ट टीम्स करत होत्या, तेच काम AI अधिक वेगानं आणि कमी खर्चात करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. “मानवाचा पर्याय नाही,” असं सांगितलं जात असलं, तरी पुनरावृत्तीची कामं पूर्णपणे स्वयंचलित होऊ शकतात, ही कल्पनाच अनेकांना अस्वस्थ करणारी ठरली आहे.

याच भीतीचा थेट परिणाम भारतीय IT शेअर्सवर दिसून आला. इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, विप्रो यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स ५ ते ७ टक्क्यांपर्यंत घसरले. काही कंपन्यांना तर एका दिवसात जबर फटका बसला. गुंतवणूकदारांना वाटतंय की, बॅक-ऑफिस काम, लीगल प्रोसेसिंग, डेटा अ‍ॅनालिसिस यांसारख्या सेवा—ज्या भारतीय IT कंपन्यांच्या कमाईचा कणा राहिल्या आहेत—त्या थेट AI च्या कक्षेत जातील. एकीकडे कार्यक्षमता वाढणार, पण दुसरीकडे लाखो नोकऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार, अशी धास्ती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे हा केवळ शेअर बाजाराचा घसरणीचा ग्राफ नाही, तर IT क्षेत्राच्या भविष्यातील संघर्षाची पहिली ठळक रेघ मानली जात आहे. AI येतोय—आणि तो केवळ दार ठोठावत नाही, तर आत येऊन खुर्ची ओढून बसण्याची तयारी करत आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *