मोठा झटका ! ‘ब्लू टिक’वर धोक्याची घंटा! व्हॉट्सॲपला कुलूप, युजर्स मात्र संभ्रमात

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १२ फेब्रुवारी २०२६ || जगभरात “गुड मॉर्निंग”पासून “ओके”पर्यंत सगळी नाती सांभाळणारा व्हॉट्सॲप आता स्वतःच अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. रशियात व्हॉट्सॲपवर बंदी येण्याची चर्चा सुरू होताच कोट्यवधी युजर्सच्या मनात एकच प्रश्न—आपलं रोजचं बोलणं आता कुठं करायचं? रशियन अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी अ‍ॅप ब्लॉक करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा समोर आल्यानंतर ही चर्चा आणखी पेटली. सरकारच्या नव्या डिजिटल धोरणाचा हा भाग असल्याचं सांगितलं जातं. थोडक्यात काय, परदेशी अ‍ॅप्सपेक्षा “आपलं सरकारी अ‍ॅप” वापरा, असा सूचक आदेशच. रशियात दररोज १०० मिलियनहून अधिक लोक व्हॉट्सॲप वापरतात—म्हणजे बंदी आली, तर ती फक्त अ‍ॅपवर नाही, तर सवयींवर असेल.

रशियाचं तंत्रज्ञान धोरण पाहिलं, तर हा धक्का अचानक वाटत नाही. आधी फेसबुक, इंस्टाग्रामला बाहेरचा रस्ता दाखवला, यूट्यूबला हळूहळू थांबवलं आणि आता व्हॉट्सॲपची पाळी. नियामक संस्था रोस्कोमनाडझोरने व्हॉट्सॲपला ऑनलाइन निर्देशिकेतून काढून टाकलं आणि लगेच अ‍ॅपमध्ये प्रवेश कठीण झाला. मात्र, “पूर्ण बंदी” आणि “मर्यादित सेवा” यातला फरक सामान्य युजरला कुठे कळणार? कुणाकडे मेसेज जातोय, कुणाकडे नाही—अशी अवस्था. व्हॉट्सॲपने मात्र निषेधाचा सूर लावून वापरकर्ते कनेक्टेड ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं आहे. पण सरकारी धोरण आणि तंत्रज्ञान कंपनी यांच्यात वाद झाला की अडकतो तो मधला युजर.

जर व्हॉट्सॲप पूर्णपणे बंद झालं, तर रशियात संवादाचं गणितच बदलू शकतं. कुटुंब, मित्र, ऑफिस, छोट्या व्यवसायांपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सगळ्यांचं रोजचं व्यवहाराचं साधन म्हणजे हे अ‍ॅप. तेच अचानक गायब झालं, तर लोकांना दुसऱ्या अ‍ॅप्सकडे वळावं लागेल—आणि त्यात सरकारी अ‍ॅपला प्राधान्य दिलं जाईल, अशीच चिन्हं आहेत. मात्र व्हॉट्सॲपला देशात टिकून राहायचं असेल, तर स्थानिक कायद्यांचं पालन आणि सरकारी अटी मान्य करणं अपरिहार्य ठरेल. मेटाने नियम झुगारले, तर परतण्याची शक्यता कमी. थोडक्यात, हा प्रश्न फक्त एका अ‍ॅपचा नाही; हा प्रश्न आहे—डिजिटल स्वातंत्र्याचा, नियंत्रणाचा आणि “आपण कुणाच्या नेटवर्कवर बोलतोय?” याचा. आणि म्हणूनच, ब्लू टिक दिसत असली तरी, युजर्सच्या मनात सध्या एकच टिक लागलेली आहे—टेन्शनची. 📱

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *