महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ सप्टेंबर – मुंबई -अॅपलने त्यांच्या स्मार्टवॉच आणि टॅब्लेट कम्प्युटर्सची नवीन सिरीज जाहीर केली. यासोबतच एक फिटनेस सर्व्हिसही कंपनीने लॉन्च केली आहे.अॅपलच्या या नवीन सीरजमध्ये 2 स्मार्टवॉच रेंज आहेत. यामध्ये एक सीरिज 6मधलं अत्याधुनिक घड्याळ आहे. तर SE व्हर्जनच्या अॅपल वॉचची स्वस्त आवृत्तीही जाहीर करण्यात आलीय.यातल्या सीरिज 6 मधल्या घड्याळात ब्लड-ऑक्सिजन सेन्सर आहे. यामुळेच हे स्मार्टवॉच आता ते वापरणाऱ्याच्या हृदयावर आणि फुफ्फुसांवर लक्ष ठेवून असेल.
याच्या मदतीने रक्तातल्या SpO2 म्हणजेच ऑक्सिजनची पातळी मोजता येईल. सध्याच्या घडीला कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या काळात रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण मोजणं महत्त्वाचं झालं असतानाच अॅपलने नवीन घड्याळात हे फीचर आणलंय.आयवॉचमध्ये आता ऑक्सिमीटर असेल.
सॅमसंग, हुआवे आणि फिटबिटच्या स्मार्टवॉचेसमध्ये हे फीचर यापूर्वीच आलेलं आहे. पण त्यांचे निर्ष्कर्ष किती योग्य मानायचे हे त्या त्या देशांतल्या नियामकांवर अवलंबून राहिलं आहे.
SE मॉडेलच्या स्वस्त व्हर्जनमध्ये मात्र हा नवीन सेन्सर असणार नाही. या स्मार्टवॉचमध्ये फक्त कमी वेगाचा प्रोसेसर असेल. महाग मॉडेलमधली स्लीप ट्रॅकिंगसारखी इतर सगळी फीचर्स यात असतील. नवीन आयपॅड एअरची घोषणाही कंपनीने केलीय. या आयपॅड्समध्ये नवीन A14 चिप असेल ज्यामुळे या आयपॅडची बॅटरी दीर्घकाळ चालू शकणार आहे.सहसा अॅपल कंपनी त्यांच्या आयफोन्समध्ये अशा प्रकारच्या चिप्स पहिल्यांदा वापरते आणि मग आयपॅडमध्ये या चिप वापरण्यात येतात. पण कोव्हिड 19च्या साथीमुळे यावर्षीच्या आयफोन लॉन्चला उशीर झालेला आहे.
या नवीन चिपमुळे आता आयपॅडवर 4K व्हीडिओज एडिट करता येतील आणि ऑगमेंटेड रिएलिट एप्सच्या मदतीने मोशन ट्रॅकिंगही करता येईल.
या नवीन आयपॅडच्या एका साईड बटनला फिंगरप्रिंट सेन्सरही असणार आहे. 10.9 इंचांची स्क्रीन असणाऱ्या या आयपॅडला USB C पोर्ट असेल.
यासोबतच अॅपलने Fitness+ या नवीन वर्कआऊट सबस्क्रिप्शनचीही घोषणा केली. अॅपल वॉचने नोंदवलेल्या माहितीच्या आधारे ही सेवा तुम्हाला वर्कआऊटसाठीचे व्हीडिओज पुरवेल आणि हे व्हीडिओज मोठ्या स्क्रीनवर पाहता येतील. 2020च्या अखेरपर्यंत जगातल्या 6 देशांमध्ये ही सेवा सुरू होईल.