महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १५ फेब्रुवारी २०२६ || Maha Metroच्या पिंपरी–निगडी विस्तारीत मार्गाचे काम अजूनही संथगतीने सुरू आहे. पिंपरी ते निगडी या 4.519 किमी लांबीच्या मार्गासाठी डिसेंबर 2023 मध्ये निविदा प्रसिद्ध झाली आणि 15 मार्च 2024 रोजी हे काम Rail Vikas Nigam Limited (आरव्हीएनएल)ला देण्यात आले. सुमारे ₹910 कोटी 18 लाख खर्चाच्या या प्रकल्पाची मुदत 3 वर्षे 3 महिने म्हणजे जून 2027 पर्यंत आहे. मात्र, दोन वर्षे उलटूनही एकही स्टेशन पूर्णत्वाला पोहोचलेले नाही. भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, टिळक चौक, खंडोबा माळ चौक आणि चिंचवड येथील सेंट मदर टेरेसा उड्डाण पूल परिसरात पिलर उभे राहिले, काही ठिकाणी सेगमेंट जोडणी झाली; पण गती अद्याप ‘कासव’च. त्यामुळे 2027 अखेरच काम पूर्ण होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ असल्याने कामात अडथळे येत आहेत. अवजड यंत्रसामग्रीची ये-जा, रात्रीच्या वेळी आवाजामुळे होणारा विरोध, पावसाळ्यात साचलेले पाणी, वृक्षतोडीवरील आक्षेप, जलवाहिन्या फुटणे अशा अनेक कारणांमुळे काम ठप्प झाले. परिणामी निगडी ते चिंचवड दरम्यानचे सर्व्हिस रस्ते आणि बीआरटी मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. धूळ, खड्डे, असमान पातळी, लोखंडी चेंबर यामुळे वाहनचालक वैतागले आहेत. वारंवार तक्रारी करूनही दर्जेदार दुरुस्ती होत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. छोटे-मोठे अपघात घडत असल्याने कामाचे सेफ्टी ऑडिट करावे, अशी मागणीही पुढे येत आहे.
निगडी ते स्वारगेट असा थेट मार्ग हवा असताना तो पिंपरी ते स्वारगेट असा करण्यात आल्याने आधीच अर्धवट कनेक्टिव्हिटीबाबत असंतोष होता. आता विस्तारीत मार्गाचे कामही संथ असल्याने नाराजी वाढली आहे. मात्र, महामेट्रो प्रशासनाचा दावा आहे की मुदतीत काम पूर्ण करण्यासाठी वेग वाढवला जात आहे आणि 2027 अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण होईल. तोपर्यंत निगडी, प्राधिकरण, आकुर्डी, चिंचवड परिसरातील नागरिकांना थेट स्वारगेटपर्यंत मेट्रो प्रवासासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2028 पासूनच ‘घरासमोरची मेट्रो’ प्रत्यक्षात उतरणार, अशी सध्याची स्थिती दिसते.
