![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १५ फेब्रुवारी २०२६ || मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे. Maharashtra Housing and Area Development Authority (म्हाडा) आता ‘अॅडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम’ अंतर्गत घरांची उभारणी करणार असून विजेत्यांना एकरकमी मोठी रक्कम भरण्याऐवजी टप्प्याटप्प्याने पैसे भरण्याची सुविधा मिळणार आहे. खासगी बिल्डर जसे बांधकामाच्या प्रगतीनुसार स्लॅबनुसार रक्कम घेतात, त्याच धर्तीवर तीन ते चार वर्षांच्या कालावधीत पैसे भरता येणार आहेत. सध्या इमारतीला ओसी मिळाल्यानंतर २५ टक्के रक्कम ४५ दिवसांत आणि उर्वरित ७५ टक्के पुढील ६० दिवसांत भरण्याची अट असल्याने अनेक विजेत्यांची बँकांकडे धावपळ होत होती. वेळेत कर्ज न मिळाल्यास घर गमावण्याची वेळ येत होती. नव्या निर्णयामुळे ही अडचण मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे.
नव्या योजनेनुसार लॉटरीत घर लागल्यावर सुरुवातीला १० टक्के रक्कम भरावी लागेल. त्यानंतर सहा ते आठ महिन्यांत १५ टक्के, दुसऱ्या वर्षी २५ टक्के आणि तिसऱ्या वर्षी आणखी २५ टक्के रक्कम भरावी लागेल. इमारतीला ओसी मिळाल्यानंतर उर्वरित २५ टक्के रक्कम भरून स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. म्हणजेच एकाच वेळी मोठा आर्थिक बोजा न पडता नियोजनबद्ध पद्धतीने घराचे पैसे भरता येणार आहेत. बांधकाम सुरू असतानाच घरांचा लॉटरीत समावेश केला जाणार असल्याने विजेत्यांना वेळ मिळेल आणि बँक कर्ज प्रक्रियाही सुलभ होईल. जसे बांधकामाचे टप्पे पूर्ण होतील, तसे बँकेकडून थेट म्हाडाकडे पैसे वर्ग होऊ शकतील.
या निर्णयाचा फायदा फक्त घरखरेदीदारांनाच नव्हे, तर म्हाडालाही होणार आहे. आतापर्यंत संपूर्ण बांधकाम खर्च प्राधिकरणाला स्वतःच्या तिजोरीतून करावा लागत होता आणि लॉटरीनंतर पैसे मिळेपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती. आता स्लॅबनुसार पैसे मिळाल्याने निधीचा प्रवाह नियमित राहील. म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांनी सांगितले की, मुंबईत तयार घरांची संख्या मर्यादित असल्याने प्रकल्प सुरू करतानाच लॉटरी काढण्याचा विचार आहे. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होईल आणि विजेत्यांनाही आर्थिक ओढाताण टाळता येईल. घराचे स्वप्न साकार करताना ‘हप्ता’ पद्धतीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
