Ration Card Update: तांदूळ गेला, मका आला! रेशनकार्डधारकांसाठी तीन महिन्यांचा नवा प्रयोग; नेमकं सत्य काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १६ फेब्रुवारी २०२६ || राज्यातील रेशनकार्डधारकांसाठी मोठा बदल जाहीर करण्यात आला आहे. प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेंतर्गत मिळणाऱ्या धान्यात मार्चपासून तात्पुरता बदल होणार असून तांदळाऐवजी गहूसोबत मका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार हा निर्णय पुढील तीन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर राबवला जाणार आहे. साठा व्यवस्थापन, पर्यायी धान्याचा वापर वाढवणे आणि स्थानिक खरेदीला चालना देणे या उद्देशाने हा बदल करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे “तांदूळ बंद” अशी चर्चा रंगली असली तरी हा कायमस्वरूपी निर्णय नसून तात्पुरता प्रयोग असल्याचे सांगितले जात आहे.

शिधा वितरणातील या बदलामुळे लाखो लाभार्थी प्रभावित होणार आहेत. अंत्योदय योजनेतील सुमारे ८७ हजार ६४ रेशनकार्डधारक (३ लाख ८६ हजार ३४ लाभार्थी) आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील ६ लाख ३७ हजार ११४ रेशनकार्डधारक (२५ लाख ६३ हजार ९७१ लाभार्थी) या निर्णयाच्या कक्षेत येतात. अंत्योदय कुटुंबांना दरमहा १० किलो मका आणि ११ किलो गहू दिला जाणार आहे, तर प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला २ किलो गहू आणि १ किलो मका मिळेल. सुरुवातीला तीन महिन्यांसाठीच हा बदल लागू राहील, त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

खरेदी आणि वितरणासाठी जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत प्रक्रिया राबवली जात आहे. बनगर, घारगाव, श्रीगोंदा, घोगरगाव, मिरजगाव, शेवगाव, पाथर्डी आणि कोपरगाव या आठ केंद्रांवर मका खरेदी सुरू असून आतापर्यंत सुमारे १५ हजार क्विंटल मका खरेदी झाल्याची माहिती आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत खरेदी प्रक्रिया सुरू राहणार आहे. मात्र जामखेड आणि संगमनेर येथे शेतकऱ्यांची नोंदणी कमी असल्याने खरेदी प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागात मक्याचा वापर भाकरी किंवा इतर पदार्थांसाठी सर्रास होतो; परंतु शहरी भागात त्याबाबत संभ्रम असल्याने जनजागृतीची गरज अधोरेखित होत आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ धान्यबदल नसून वितरण व्यवस्थेची नवी कसोटी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *