महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ सप्टेंबर – मुंबई – भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरण हे बनावट असून त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. केंद्र सरकार लोकशाहीचा आवाज कसा दाबत आहे, हे समोर येण्यासाठी संबंधित कागदपत्रं शरद पवारांनीच सार्वजनिक करावीत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
“एल्गार परिषदेचे आयोजन निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत यांनी केलं होतं. दरम्यान, केंद्रात आरएसएस, भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांनी एल्गार परिषदेला बदनाम केलं. यानिमित्तानं केंद्रानं राजकारण केलं असून या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे, अनावश्यक कायदे या प्रकरणात लावण्यात आले,” असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.