![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १८ फेब्रुवारी २०२६ || देशात फेब्रुवारीतच मार्चची चाहूल लागली असतानाच हवामान पुन्हा पलटी मारणार आहे. वाढत्या तापमानाला ब्रेक लावण्यासाठी १७, १८ आणि १९ फेब्रुवारीदरम्यान १० राज्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभाग (IMD) ने व्यक्त केला आहे. पश्चिम हिमालयीन पट्ट्यात हलका ते मध्यम पाऊस आणि उंच भागांत हिमवृष्टीची शक्यता असून, वायव्य भारतात गडगडाटासह सरी कोसळू शकतात. ओडिशाच्या काही भागांत सकाळी दाट धुक्याची शक्यता १८ फेब्रुवारीपर्यंत कायम राहू शकते. ज्या राज्यांना इशारा देण्यात आला आहे त्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, राजस्थान, अंदमान आणि निकोबार बेटे आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे.
उत्तर भारतात बदलते चित्र दिसू शकते. पश्चिम यूपीतील मेरठ, सहारनपूर, गाझियाबाद आणि नोएडा परिसरात १७-१८ फेब्रुवारीला हलक्या सरींची शक्यता आहे; मात्र मुसळधार पावसाचा इशारा नाही. उत्तराखंडमध्ये चमोली, रुद्रप्रयाग, पिथोरागडसह डोंगराळ जिल्ह्यांत पाऊस, तर १८-१९ ला उंचावर हिमवृष्टीचा अंदाज आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये १७ तारखेला तापमान २-३ अंशांनी वाढून दुपारी उष्णता जाणवेल; पुढील २४ तासांत हलका पाऊस आणि ताशी ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हिमाचलमध्ये शिमला, मंडी, कांगडा आदी जिल्ह्यांत सरी; तर काश्मीर खोऱ्यात श्रीनगरसह काही भागांत पावसाचा अंदाज आहे.
पश्चिमेकडे राजस्थानमध्ये ढगाळ वातावरणासह विखुरलेला पाऊस; हनुमानगड, श्रीगंगानगर, बिकानेर, चुरू येथे जोरदार वाऱ्यांसह हलक्या सरी संभवतात. मध्य प्रदेशमध्ये १८-१९ फेब्रुवारीला गडगडाटी वादळे आणि पावसाची शक्यता असून सिवनी, छिंदवाडा, बालाघाट, होशंगाबाद परिसरात बदल जाणवू शकतो. बिहारमध्ये सध्या पावसाचा अंदाज नसला तरी मिथिला-सीमांचलमध्ये मध्यम धुके आणि सौम्य थंडी कायम राहू शकते. पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे हवामानाचा हा ‘तीन दिवसांचा अध्याय’ रंगणार असल्याने नागरिकांनी प्रवास, शेतीकामे आणि आरोग्याबाबत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
