✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २० मार्च २०२६ ।।गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भाषण करताना Raj Thackeray यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत राज्याच्या कर्जाच्या मुद्द्यावर जोरदार हल्ला चढवला. “विकास, विकास म्हणता… पण महाराष्ट्राचं कर्ज किती वाढलंय याचा हिशेब आहे का?” असा सवाल करत त्यांनी Devendra Fadnavis यांना लक्ष्य केलं.
राज ठाकरेंनी तुलना करत सांगितलं की, Prithviraj Chavan मुख्यमंत्री असताना राज्यावर सुमारे २ लाख कोटींचं कर्ज होतं. मात्र आज तेच कर्ज तब्बल ११ लाख कोटींच्या घरात पोहोचलं आहे. “महाराष्ट्राला तीन ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचं स्वप्न दाखवलं जातंय, पण प्रत्यक्षात कर्जाचा डोंगर वाढतोय,” असा टोला त्यांनी लगावला.
फक्त कर्जावरच नाही, तर शेतकरी प्रश्नावरही त्यांनी तीव्र भाष्य केलं. “तीन वेळा कर्जमाफी झाली, पण आत्महत्या थांबल्या का?” असा सवाल करत राज्यातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती त्यांनी मांडली. “रोज शेतकरी आत्महत्या करत आहेत, पण दुसरीकडे कोस्टल रोडसारखे प्रकल्प राबवले जात आहेत,” असं म्हणत त्यांनी विकासाच्या प्राधान्यक्रमावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
याच वेळी त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांवरही भाष्य केलं. “आपण आपल्या भाषेपासून आणि ओळखीपासून दूर जात आहोत,” असा इशारा देत त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, लोकांना मनोरंजनात गुंतवून ठेवून सरकारवर प्रश्न विचारू नयेत, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

