![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २१ मार्च २०२६ ।। राज्यात हवामानाने अक्षरशः ‘कंबरडे मोडले’ असून अवकाळी पावसाने आता सलग काही दिवस ठाण मांडले आहे. India Meteorological Department (IMD) च्या इशाऱ्यानुसार २४ मार्चपर्यंत राज्यात वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीटीचा धोका कायम राहणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विशेषतः परभणी, हिंगोली, जालना, नांदेड आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर राहण्याची शक्यता आहे. आज नागपूर, गोंदिया आणि अमरावती भागात गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने झाडे उन्मळून पडणे किंवा वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनाही घडू शकतात.
या अवकाळी संकटाचा सर्वात मोठा फटका बसतोय तो शेतकऱ्यांना. धुळे जिल्ह्यात साक्री, शिरपूर आणि शिंदखेडा भागात झालेल्या गारपीटीमुळे मक्यापासून ते इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणीच्या उंबरठ्यावर आलेल्या पिकांवर पावसाने पाणी फिरवल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू असले तरी, मागील नुकसानीची भरपाई अद्याप न मिळाल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढताना दिसतोय.
दरम्यान, २५ मार्चनंतर हवामानात बदल होऊन पुन्हा उन्हाचा तडाखा वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजेच काही दिवसांतच ‘गारपीट ते उकाडा’ असा दुहेरी फटका बसणार आहे. या बदलत्या हवामानात नागरिकांनी काळजी घेणं, तर शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची गरज निर्माण झाली आहे. राज्यावर आलेलं हे अवकाळी संकट केवळ हवामानाचं नाही, तर अर्थकारण आणि शेतीच्या भवितव्याचंही मोठं आव्हान बनलं आहे.
