![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ मार्च २०२६ ।। आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या वादळात अखेर सोनं-चांदीच्या बाजाराने मोठा पलटी घेतला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून गगनाला भिडलेले दर आता घसरू लागले असून, तब्बल दोन महिन्यांनंतर सोन्याचा भाव दीड लाखांच्या खाली आला आहे. सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे १,४८,६२९ रुपये प्रति तोळा इतका नोंदवला जात आहे. तर चांदीही घसरत २,३७,९३० रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. त्यामुळे दीर्घकाळ वाट पाहणाऱ्या ग्राहकांना आणि गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मध्यपूर्वेतील तणाव, विशेषतः Iran-Israel संघर्षामुळे बाजारात अनिश्चितता वाढली होती. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळतात, त्यामुळे सोन्याचे दर वाढतात—पण आता चित्र बदलताना दिसत आहे. डॉलरची मजबूती, व्याजदरातील बदल आणि जागतिक बाजारातील हालचालींमुळे सोन्यावर दबाव वाढला आणि दर खाली आले.
या घसरणीचा सर्वात मोठा फायदा सामान्य ग्राहकांना होणार आहे. लग्नसराईचा हंगाम आणि सणासुदीच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर ही दरकपात म्हणजे जणू ‘सुवर्णसंधी’च आहे. काही दिवसांपूर्वी आवाक्याबाहेर गेलेलं सोनं आता पुन्हा खरेदीसाठी उपलब्ध झाल्याने सराफा बाजारात गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या मते, ही घसरण कायमस्वरूपी असेलच असं नाही. जागतिक परिस्थिती अजूनही अस्थिर आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा चढ-उतार पाहायला मिळू शकतात. म्हणूनच गुंतवणूक करताना घाई न करता टप्प्याटप्प्याने खरेदी करणे हा शहाणपणाचा मार्ग ठरू शकतो. सध्या मात्र एकच चित्र स्पष्ट आहे—सोन्याने घेतलेली ही घसरण खरेदीदारांसाठी सोन्याहून पिवळी ठरू शकते!
