![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २३ मार्च २०२६ ।। नवीन आर्थिक वर्ष सुरू होताच पॅन कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. १ एप्रिल २०२६ पासून केंद्र सरकार पॅनसाठीचे नियम अधिक कडक करत असून, आता केवळ आधार कार्डवर पॅन मिळवण्याची सोपी पद्धत बंद होणार आहे. म्हणजेच “आधार दिला आणि पॅन मिळाला” ही जलद प्रक्रिया आता इतिहासजमा होणार असून, अर्जदारांना अधिक कागदपत्रांची तयारी ठेवावी लागणार आहे.
नव्या नियमांनुसार अर्ज करताना आधारसोबतच ओळख आणि जन्मतारीख सिद्ध करणारी अतिरिक्त कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असेल. यात जन्म दाखला, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा दहावीचे प्रमाणपत्र यांसारख्या कागदपत्रांचा समावेश असेल. याशिवाय पॅन आणि आधारवरील नाव, जन्मतारीख व इतर तपशील अक्षरशः जुळणे आवश्यक असेल. किंचित तफावत आढळल्यास अर्ज थेट नाकारला जाऊ शकतो.
सरकारने यासाठी नवीन अर्ज फॉर्म देखील तयार केले आहेत. १ एप्रिलनंतर जुने फॉर्म पूर्णपणे बाद ठरणार असून, सर्व अर्ज नवीन स्वरूपातच स्वीकारले जातील. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत जुनी आणि सोपी प्रक्रिया वापरणाऱ्यांसाठी ही शेवटची संधी मानली जात आहे.
या बदलामागचा उद्देश स्पष्ट आहे—बनावट पॅन कार्डना आळा घालणे आणि आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक करणे. मात्र, यामुळे पॅन मिळण्याची प्रक्रिया थोडी वेळखाऊ होणार आहे. थोडक्यात, आधी सोपं असलेलं काम आता अधिक शिस्तबद्ध आणि तपासणीखाली येणार आहे. त्यामुळे अर्जदारांनी कागदपत्रांची तयारी आधीच करून ठेवली, तरच या नव्या नियमांच्या जंजाळातून सहज मार्ग काढता येईल.
