✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २४ मार्च २०२६ ।। मध्यपूर्वेतील धगधगत्या संघर्षात अखेर शांततेची एक किरण दिसू लागली आहे. Donald Trump यांनी अचानक मोठी घोषणा करत इराणच्या वीज प्रकल्पांवरील नियोजित हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामागे अमेरिका आणि इराणदरम्यान सुरू झालेल्या सकारात्मक चर्चांचा मोठा हात असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. युद्ध चौथ्या आठवड्यात पोहोचले असताना, हा निर्णय तणाव कमी करण्याच्या दिशेने पहिले ठोस पाऊल मानला जात आहे.
ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केलं की, “अमेरिका आणि इराणमध्ये शत्रुत्व पूर्णपणे संपवण्यासाठी विधायक चर्चा सुरू आहे.” या चर्चांना संधी मिळावी म्हणूनच अमेरिकेने लष्करी कारवाईला तात्पुरता ब्रेक दिला आहे. मात्र, ही स्थगिती कायमस्वरूपी नसून चर्चेच्या प्रगतीवर पूर्णपणे अवलंबून आहे. दुसरीकडे, इराणकडून अजून अधिकृतरीत्या या चर्चेला दुजोरा देण्यात आलेला नाही, त्यामुळे परिस्थिती अजूनही नाजूकच आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच Donald Trump यांनी इराणला ४८ तासांचा अल्टिमेटम देत वीज प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनेही कठोर भूमिका घेत आखाती समुद्रात स्फोटके पसरवण्याचा इशारा दिला होता. अशा तणावपूर्ण पार्श्वभूमीवर अचानक आलेली ही ‘५ दिवसांची शांतता’ ही केवळ रणनिती आहे की खऱ्या अर्थाने युद्धविरामाची सुरुवात, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
आगामी काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. जर या चर्चांना यश मिळाले, तर मध्यपूर्वेतील तणाव मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. अन्यथा, ही फक्त वादळाआधीची शांतता ठरण्याची भीतीही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
