![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २८ मार्च २०२६ ।। देशातील नागरी विमान वाहतुकीच्या सुरक्षेबाबत चिंताजनक चित्र समोर आले असून संसदीय समितीच्या अहवालाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जानेवारी २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत तपासण्यात आलेल्या ७५४ व्यावसायिक विमानांपैकी तब्बल ३७७ विमानांमध्ये तांत्रिक बिघाड आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हणजेच जवळपास प्रत्येक दुसऱ्या विमानात काही ना काही तांत्रिक त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे देशातील हवाई प्रवास किती सुरक्षित आहे, याबाबत प्रवाशांमध्ये चिंता वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक क्षेत्रात मोठ्या सुधारणांची गरज असल्याचे तज्ज्ञांकडूनही सांगितले जात आहे.
अहवालात विविध विमान कंपन्यांमधील बिघाडांची आकडेवारीही समोर आली आहे. IndiGo या कंपनीच्या सर्वाधिक विमानांची तपासणी करण्यात आली असून ४०५ विमानांपैकी १४८ विमानांमध्ये तांत्रिक समस्या आढळल्या. त्याचप्रमाणे Air India च्या १६६ विमानांपैकी १३७ विमानांमध्ये बिघाड नोंदवला गेला, तर Air India Express च्या १०१ विमानांपैकी ५४ विमानांमध्ये सातत्याने तांत्रिक त्रुटी आढळल्या. विशेष म्हणजे, एकूण आढळलेल्या दोषांपैकी निम्मे बिघाड हे एअर इंडिया समूहाच्या विमानांमध्ये असल्याचे समितीने नमूद केले आहे. या आकडेवारीमुळे विमान कंपन्यांच्या देखभाल आणि तपासणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या वाढत्या तांत्रिक त्रुटींमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर तसेच उड्डाणांच्या विश्वासार्हतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय अर्थात Directorate General of Civil Aviation (DGCA) यांच्याकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार, Air India ला आतापर्यंत ९ कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून, २०२५ अखेरपर्यंत विविध विमान कंपन्यांना मिळून १९ नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात हवाई सुरक्षेबाबत कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
