मुंबईतील तीन Domino’s आउटलेटवर FDAची कठोर कारवाई; स्वच्छता, अन्नसाठवणूक आणि कीटकनियंत्रणावर गंभीर आक्षेप
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ ऑगस्ट २०२६ ।। मुंबईकरांच्या जिभेवर लोकप्रिय असलेल्या पिझ्झाच्या चवीला आता स्वच्छतेचा प्रश्न चिकटला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) Domino’s Pizzaच्या विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील तीन आस्थापनांचे अन्न व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. या तिन्ही शाखा Jubilant FoodWorksच्या अखत्यारीत आहेत. Schedule-4 मधील स्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन न झाल्याचे तपासणीत आढळल्याचे FDAने नमूद केले आहे. म्हणजे ग्राहकाला पिझ्झा गरम हवा असतो; पण त्यामागची स्वच्छता व्यवस्था त्याहूनही गरम असली पाहिजे, हेच या कारवाईने दाखवून दिले.
विलेपार्ले शाखेच्या तपासणीत FSSAI परवाना, पिण्याच्या पाण्याची तपासणी, अन्नसाठवणूक, तापमान नियंत्रण, कीटकनियंत्रण आणि स्वच्छता सुविधा याबाबत त्रुटी आढळल्या. गोठवलेले पदार्थ योग्य तापमानात ठेवणे, त्याचे नियमित निरीक्षण करणे आणि Food Preparation Area स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. किचनमधील दरवाजे, फरशी आणि Chilling Roomमध्ये दुरुस्ती करून उंदीर व इतर कीटकांचा प्रवेश रोखण्याचेही निर्देश देण्यात आले.
बोरिवलीतील शाखेची परिस्थितीही समाधानकारक नसल्याचे तपासणीत समोर आले. तेथे ५४ टक्के गुणांसह Non-Compliance नोंदवण्यात आली. कच्चे आणि शिजवलेले अन्न, तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ यांचे योग्य विलगीकरण करण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले. उपकरणे आणि भांडी योग्य पद्धतीने स्वच्छ व निर्जंतुक करण्यासह Food Preparation Areaमधील तेलकटपणा आणि अन्नाचे अवशेष हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या. घाटकोपरच्या R-City Mallमधील शाखेत तर कीटकांचा प्रादुर्भाव, Cleaning Scheduleचा अभाव, तापमान नियंत्रणातील त्रुटी, FIFO/FEFO पद्धतीचे पालन न होणे आणि आवश्यक Food Safety Records उपलब्ध नसल्याचे आढळले.
या कारवाईचा अर्थ एखाद्या ब्रँडला दोषी ठरवणे एवढाच नाही; ग्राहकाच्या ताटात जाणाऱ्या प्रत्येक घासाची जबाबदारी किती मोठी आहे, याची आठवण आहे. मोठे नाव, चमकदार दुकान आणि महागडा ब्रँड यामुळे अन्नसुरक्षेचे नियम बदलत नाहीत. उलट मोठ्या साखळीतील आस्थापनांकडूनच अधिक काटेकोरपणाची अपेक्षा असते. राज्यभर FDAने केलेल्या तपासणीत १०४ चेन रेस्टॉरंटची तपासणी, ९५ सुधारणा नोटिसा आणि काही परवाने निलंबित केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही कारवाई केवळ तीन पिझ्झा दुकानांची गोष्ट नसून, ‘ब्रँड मोठा की नियम मोठे?’ या प्रश्नाचे उत्तर देणारा इशारा ठरला आहे.
