✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ मार्च २०२६ ।। मध्यपूर्वेतील तणावामुळे Strait of Hormuz बंद झाल्याने केवळ तेल, पेट्रोल, डिझेल आणि LPG पुरवठ्यावर परिणाम होत नाही, तर आता भारताच्या महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर मिशनवरही त्याचे सावट दिसू लागले आहे. ऊर्जा संकटामुळे जगभरात पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, भारतासमोर एक नवे आणि गंभीर आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः चिप उत्पादनासाठी अत्यावश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे भारताच्या ‘सेमीकंडक्टर मिशन 2.0’ च्या पुढील टप्प्यावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत.
या संकटातील सर्वात मोठा फटका ‘हेलियम’सारख्या महत्त्वाच्या गॅसला बसत आहे. जगातील मोठा हिस्सा Qatarमधून येणाऱ्या या गॅसच्या पुरवठ्यावर होर्मुझ मार्ग बंद झाल्याने मर्यादा येत आहेत. सेमीकंडक्टर निर्मितीत हेलियमला पर्याय नसल्यामुळे भारतातील चिप पॅकेजिंग उद्योगावर काही आठवड्यांतच परिणाम होऊ शकतो, असा तज्ज्ञांचा इशारा आहे. बहुतेक कंपन्यांकडे केवळ ४ ते ८ आठवड्यांचा साठा असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनू शकते. याशिवाय, नॅफ्था आणि इतर पेट्रोकेमिकल उत्पादनांच्या पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे प्रिंटेड सर्किट बोर्ड आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगावरही ताण वाढत आहे.
ऊर्जा किमतींमध्ये होणारी वाढ हे या संकटाचे आणखी एक मोठे दुष्परिणाम आहे. सेमीकंडक्टर उत्पादन, डेटा सेंटर्स आणि AI पायाभूत सुविधा या सर्व क्षेत्रांना प्रचंड ऊर्जेची गरज असते. कच्च्या तेलाच्या आणि LNG च्या वाढत्या किमतीमुळे उत्पादन खर्च वाढणार असून, भारतातील AI आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या विस्तारावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, हे संकट भारताच्या सेमीकंडक्टर क्षेत्राला पूर्णपणे थांबवणार नाही, पण त्याची गती नक्कीच कमी करू शकते. वाढता खर्च, पुरवठ्यातील अडथळे आणि गुंतवणुकीतील अनिश्चितता यामुळे भारताच्या या ‘डिजिटल स्वप्ना’समोर नवे आव्हान उभे राहिले आहे.
