![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल २०२६ ।। ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रावर अवकाळीचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला असून, वादळी वारे, मेघगर्जना, गारपीट आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग ३० ते ६० किमी प्रतितास इतका वेगवान राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ३१ मार्च रोजी अनेक जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला होता, तर आता पुढील दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जाहीर करण्यात आला आहे.
नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात तुरळक पावसाचा अंदाज असूनही वादळी परिस्थिती कायम राहणार आहे. १ आणि २ एप्रिल रोजी राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, वातावरणातील अस्थिरता पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या पार्श्वभूमीवर कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना विशेष सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. काढणी केलेल्या पिकांचे सुरक्षित साठवण, ताडपत्रीचा वापर, तसेच शेतात पाणी साचू नये यासाठी योग्य निचरा व्यवस्था ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे फळबागा, भाजीपाला आणि इतर पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत असून, हा पाऊस दिलासा देणारा नसून चिंताजनक ठरत असल्याचे चित्र सध्या राज्यभर पाहायला मिळत आहे.
