Census Schedule Maharashtra : जनगणनेचा काउंटडाऊन सुरू! महाराष्ट्रात मे-जूनमध्ये मोठी मोहीम; डिजिटल पद्धतीने होणार सर्वेक्षण

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १ एप्रिल २०२६ ।। देशातील सर्वात महत्त्वाच्या प्रशासकीय प्रक्रियांपैकी एक असलेल्या जनगणनेचा कार्यक्रम आता ठरला असून महाराष्ट्रासाठीही स्पष्ट वेळापत्रक जाहीर झाले आहे. २०२७ च्या जनगणनेअंतर्गत राज्यात प्रत्यक्ष घरगुती सर्वेक्षणाचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान पार पडणार आहे. याआधी १ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ‘स्व-गणना’ करण्याची संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यंदाची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होत असून, ही देशासाठी एक मोठी तांत्रिक झेप मानली जात आहे.

देशव्यापी स्तरावर हा उपक्रम १६ एप्रिलपासून सुरू होऊन ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे. नागरिकांना वेब-आधारित प्लॅटफॉर्मवर १६ भाषांमध्ये स्वतःची माहिती भरता येणार आहे. यामुळे गणक घरी येण्यापूर्वीच माहिती नोंदवणे शक्य होणार आहे. सुमारे ३० लाखांहून अधिक कर्मचारी, गणक आणि पर्यवेक्षक या मोहिमेत सहभागी होणार असून, मोबाईल ॲपच्या माध्यमातून थेट डेटा संकलन केले जाणार आहे. डेटा सुरक्षेसाठीही विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

या जनगणनेत नागरिकांना घर, कुटुंब रचना, शिक्षण, सुविधा, उत्पन्नाचे साधन, तसेच घरातील मूलभूत सुविधा यांसारख्या एकूण ३३ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. पाणी, वीज, इंटरनेट, शौचालय, वाहन, गॅस कनेक्शन यांसारख्या बाबींचाही सविस्तर तपशील विचारला जाणार आहे. त्यामुळे ही जनगणना केवळ लोकसंख्येची मोजणी नसून, राज्याच्या विकासाचा आराखडा ठरवणारा महत्त्वाचा डेटा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *