![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ४ एप्रिल २०२६ ।। ऐन उन्हाळ्यात कोसळलेल्या अवकाळी पावसाने पुणे शहराची अक्षरशः दाणादाण उडवली असून ‘स्मार्ट सिटी’च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. काही तासांच्या पावसातच शहरातील रस्ते नद्यांसारखे वाहू लागले. एनडीए परिसरात तब्बल 84 मिमी तर शिवाजीनगर भागात 65 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र एवढ्याशा पावसात शहर जलमय होण्यामागे प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत असल्याचा आरोप पुणेकर करत आहेत.
शहरातील नालेसफाईचा अभाव, पावसाळी गटारांची अपुरी क्षमता आणि वेगाने वाढणाऱ्या बांधकामांमुळे नैसर्गिक पाण्याचे मार्ग बंद झाल्याचं स्पष्ट होत आहे. अनेक ओढ्यांवर अतिक्रमण झाल्याने पाण्याचा नैसर्गिक प्रवाह रोखला गेला आहे. त्यातच काँक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांमुळे पाणी जमिनीत न मुरता थेट रस्त्यांवर साचत आहे. परिणामी, काही तासांच्या पावसानेच शहर ‘जलमय’ होत असल्याचं चित्र समोर आलं आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांचा संताप वाढला असून “स्मार्ट सिटी की नरक सिटी?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. उपमहापौर परशुराम वाडकर यांनीही या परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. दुसरीकडे महापालिकेकडून मात्र जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होत आहे.
अवकाळी पावसातच शहराची ही अवस्था झाली असल्याने आगामी पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आताच ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर ‘स्मार्ट सिटी’चा दावा केवळ कागदावरच राहील, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
