![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ६ एप्रिल २०२६ ।। वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी दिलासा देणारी, पण खिशाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. Mumbai–Pune Expressway आता तब्बल १० पदरी होणार आहे. वाढत्या वाहनसंख्येमुळे आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. घाटात झालेल्या अपघातानंतर दोन-दोन दिवस अडकून पडलेल्या वाहनचालकांच्या अनुभवाने प्रशासनालाही धक्का बसला आणि विस्ताराची गती वाढली. त्यामुळे भविष्यातील कोंडी टाळण्यासाठी हा ‘दहा पदरी’ पर्याय पुढे आणण्यात आला आहे. प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुरळीत करण्याचा दावा केला जात असला, तरी या विकासामागे आर्थिक गणितही तितकंच मोठं आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी प्रचंड निधी लागणार असल्याने Maharashtra State Road Development Corporation कर्ज उभारण्याच्या तयारीत आहे. त्याची परतफेड करण्यासाठी टोल वसुलीचा कालावधी वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच, २०४५ पर्यंत असलेली मुदत आता थेट २०६० पर्यंत जाऊ शकते. रस्ता रुंद होणार, पण टोलचा ‘कालावधी’ही तितकाच वाढणार — हा व्यवहार प्रवाशांसाठी गोड की कडू, हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे वेगवान प्रवासाचा दिलासा, तर दुसरीकडे दीर्घकाळ चालणारी टोल वसुली, या दोन टोकांमध्ये सामान्य प्रवासी अडकणार असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, या प्रकल्पासोबतच ‘मिसिंग लिंक’ हा महत्त्वाचा टप्पाही निर्णायक ठरणार आहे. घाटातील अवघड वळणं टाळून सरळ आणि सुरक्षित मार्ग देणारा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास प्रवासाचा वेळ कमी होईल आणि अपघातांची शक्यता घटेल. विस्ताराचे काम टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय घेतल्याने वाहतुकीवर परिणाम कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे. मात्र, ‘रस्ता मोठा झाला की प्रवास सुखकर होईल’ हे जितकं खरं, तितकंच ‘टोलचा प्रवासही लांबणार’ हेही वास्तव आहे. त्यामुळे विकासाच्या या महामार्गावरून जाताना वेग वाढेल, पण खिशाचा मीटर किती वेगाने धावेल, याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
