Gold Silver Rate 7 May: युद्ध थांबण्याच्या चर्चांनी सोन्याला ‘सुवर्ण’ झळाळी; चांदीने तर थेट अडीच लाखांचा टप्पा पार केला!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ मे २०२६ ।।Gold Silver Prices: अमेरिका-इराण संघर्ष शांततेच्या दिशेने सरकत असल्याच्या चर्चांनी जागतिक बाजारात नवे समीकरण तयार केले असून, त्याचा थेट परिणाम आता सराफा बाजारावर दिसू लागला आहे. तेलाच्या किमती घसरत असतानाच सोने आणि चांदीच्या भावांनी मात्र पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. गुरुवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात वाढ झाली, तर चांदीने तर थेट वेग पकडत गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला. वाढत्या दरांमुळे सामान्य खरेदीदारांची चिंता वाढली असली, तरी गुंतवणूकदारांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एमसीएक्सवर जून वायदा सोन्याचा भाव ५६९ रुपयांनी वाढून १ लाख ५२ हजार ७०१ रुपयांवर पोहोचला, तर चांदीने तब्बल २ हजार ६१५ रुपयांची झेप घेत थेट २ लाख ५५ हजार ८२६ रुपयांचा स्तर गाठला. जागतिक बाजारातही सोन्याचे दर मजबूत राहिले असून, अमेरिकन बाजारात प्रति औंस सोन्याने ४,७०६ डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. पश्चिम आशियातील तणाव काहीसा कमी होण्याची चिन्हे आणि अमेरिका-इराण यांच्यातील संभाव्य करार यामुळे गुंतवणूकदार सावध भूमिका घेत आहेत. मात्र, सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे वाढता ओढा कायम असल्याचे चित्र आहे.

दिल्ली सराफा बाजारात बुधवारीच सोन्याने मोठी मुसंडी मारत १० ग्रॅममागे १ लाख ५५ हजार रुपयांचा स्तर गाठला होता, तर चांदीनेही २.५४ लाख रुपये प्रति किलोचा टप्पा पार केला होता. अखिल भारतीय सराफा संघटनेच्या माहितीनुसार, ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याच्या दरात जवळपास दोन टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक राजकीय हालचाली, तेलबाजारातील चढउतार आणि गुंतवणूकदारांचा सुरक्षिततेकडे कल यामुळे पुढील काही दिवसांतही सोने-चांदीच्या दरात अस्थिरता कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *