Ashtavinayak Temple Closure 2026: बाप्पांच्या दाराला महिनाभर कुलूप ! अष्टविनायकातील तीन मंदिरे महिनाभर भाविकांसाठी बंद :

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०९ मे २०२६ ।। पुणे: पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक यात्रेला निघालेल्या भाविकांना आता थोडा ब्रेक घ्यावा लागणार आहे. कारण अष्टविनायकातील तीन प्रमुख मंदिरांच्या दारावर महिनाभरासाठी कुलूप लागणार आहे. श्री मयूरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर ही भाविकांच्या अखंड गर्दीने गजबजणारी देवस्थाने आता उद्या रविवार, १० मेपासून ते ९ जूनपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली या मंदिरांच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे “बाप्पा भेटणार कधी?” असा प्रश्न अनेक भक्तांच्या चेहऱ्यावर उमटू लागला आहे. एरवी गणरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा लावणाऱ्या भाविकांना आता मंदिराच्या बंद दरवाजाकडे पाहूनच समाधान मानावे लागणार.

पुरातत्व विभागाने या कामासाठी खास नियोजन आखले असून, मंदिरांचा मूळ पौराणिक बाज अबाधित ठेवत सुबक दगडी बांधकामाद्वारे संवर्धन केले जाणार आहे. गाभारा आणि सभामंडप यांचे जतन करताना जुन्या स्थापत्यकलेचा आत्मा कायम ठेवण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र काम सुरू असताना भाविकांची मोठी गर्दी झाल्यास कामात अडथळे निर्माण होऊ शकतात आणि दुरुस्तीला अधिक वेळ लागू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. म्हणूनच मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. देवळात शांतता ठेवण्यासाठी प्रशासनाला आता फलक लावावे लागत आहेत, हे दृश्य अनेकांना खटकणारे आहे. “गणपती बाप्पालाही आता दुरुस्तीची सुट्टी,” अशी मिश्कील प्रतिक्रिया काही भाविकांकडून व्यक्त होत आहे.

या निर्णयामागे मोठी प्रशासकीय प्रक्रिया पार पडली आहे. पुरातत्व विभागाच्या संचालकांनी सह धर्मादाय आयुक्तांकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला होता. त्यानंतर मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग, ग्रामस्थ आणि संबंधित अधिकाऱ्यांची बाजू ऐकून घेत गुरुवारी अखेर मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. अष्टविनायक यात्रा ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक भावविश्वाचा भाग मानली जाते. त्यामुळे मंदिरबंदीची बातमी समजताच अनेक भाविकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. काहींनी आधीच यात्रेचे नियोजन केले होते, तर काही जण नवस फेडण्यासाठी निघण्याच्या तयारीत होते. पण आता भक्तीला थोडा विराम देत संवर्धनाच्या या कामाला साथ द्यावी लागणार आहे. कारण मंदिरांचे वैभव टिकले तरच पुढच्या पिढ्यांनाही गणरायाच्या या पवित्र वास्तूंचा दिव्य अनुभव घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *